शिवदीप लांडे यांनी आयपीएस सोडण्याचं सांगितले कारण, म्हणाले- मला बिहारची स्थिती आणि दिशा बदलायची
Former Ips Shivdeep Lande : महाराष्ट्राचे भूमीपूत्र आणि बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी शुक्रवारी आपल्या नवीन इनिंगची घोषणा केली आहे. लांडे यांनी बिहारमध्ये 'रन फॉर सेल्फ' या बॅनरखाली काम करणार असल्याचं सांगितलं आहे. काल ता. 28 फ्रेबुवारी रोजी त्यांनी पटना येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुढे बोलताना शिवदीप लांडे म्हणाले की, आयपीएस होण्याचे स्वप्न लाखो लोकांचे असते. आयपीएस झाल्यावर तर कुटुंबियांसाठी तो मोठा आनंदाचा क्षण होता. मी 18 वर्षांपर्यंत बिहारची सेवा केली. माझ्यासाठी आयजी स्तरावर अनेक मोठ्या संधी होत्या.

शिवदीप लांडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, मला वाटतं माणसावर मातीचेही ऋण असते. एक ऋण असते आपल्या मातृभूमीचे अन् दुसरे असते आपल्या कर्मभूमीचे. जेव्हा मी बिहारकडे पाहतो, तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पुढील दहा वर्षांमध्ये बिहार कुठे असेल?, माझ्या मनाला वाटले की, नोकरीचा त्याग केला पाहिजे.
मी केवळ घरात आईला विचारले तेव्हा आईने पेन्शनबद्दल विचारले. अखेर मी अंतर्मनाचा ठाव घेतला अन् अखेर राजीनामा दिला. मला बिहारच्या भल्यासाठी काम करायचं आहे. पुढील 10 वर्षांत बिहार बदलण्यासाठी एक प्लॅन तयार करण्यात आला आहे. बिहारची दिशा आणि स्थिती बदलणे हे माझं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले.
शिवदीप लांडे यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी ममता देखील उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेदरम्यान शिवदीप लांडे म्हणाले की 4 मार्च रोजी पासून मुंगेर येथून नवीन उपक्रम सुरू करणार आहे. लांडे यांनी मुंगेर येथूनच आयपीएस सेवेची सुरुवात केली होती आणि आता ते तिथूनच आता दुस-या इनिंगला सुरुवात करणार आहेत.
मला निस्वार्थपणे सेवा करायची आहे
पुढे बोलताना लांडे म्हणाले की, सध्या बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार नाही. बिहारमधील तरुणांना जागरूक करण्यासाठीच या क्षेत्रात उतरलो आहे. राजीनाम्याचे कारणही हेच आहे. बिहार संपूर्ण जगात आघाडीवर आहे. ही आर्यभट्ट, चाणक्य, चंद्रगुप्त आणि जेपी यांची भूमी आहे. येथील तरुण स्वतःला ओळखू शकत नाहीत.
मी बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन जागरूकता निर्माण करेन. मी 4 मार्चपासून मुंगेर येथून माझा प्रवास सुरू करणार आहे. या उपक्रमातून बिहारच्या तरुणांच्या भेटीगाठी घेणार आहे. इथे मी त्यांच्यासोबत 20 किलोमीटर धावेन. त्याचप्रमाणे, मी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लोकांसोबत धावेन. बिहारच्या जनतेला आवाहन करताना ते म्हणाले की, ज्यांना बिहारची स्थिती आणि दिशा बदलायची आहे, बिहारला पुढे घेऊन जायचे आहे, त्यांनी आमच्यात सामील व्हावे. मला निस्वार्थपणे सेवा करायची आहे.
प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिपदीप लांडे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका, मी उचललेले पाऊल राजकीय हेतूने प्रेरित नाही. तसेच मी हे कोणाच्याही सल्ल्यानुसार हे करत नाही. मी कोणत्याही पक्षाच्या विचारसरणीचा नाही. माझी स्वतःची विचारसरणी आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात किंवा व्यक्तीसोबत जोडलो जात नाही. सध्या मला बिहारमधील लोकांमध्ये जायचे आहे. मला त्याला भेटायचे आहे आणि त्याच्याशी बोलायचं, असल्याचं त्यांनी सांगितले.
'मी आतून अजूनही खाकीमध्ये आहे'
लांडे म्हणाले की, बिहारमधील तरुण देशातील प्रत्येक क्षेत्रात पुढे काम करत आहेत. येथील तरुणांकडून सर्वांनाच अपेक्षा आहेत. म्हणूनच बिहारमधील तरुणांना भेटण्यासाठी पोहोचत आहे. "मी बिहारची स्थिती आणि दिशा सुधारण्यासाठी बाहेर पडलो आहे. मी खाकी वर्दी सोडली आहे पण आतून मी अजूनही खाकीमध्येच आहे. आता आपल्याला फक्त बिहार बदलण्यासाठी काम करायचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
19 सप्टेंबर रोजी दिला राजीनामा
माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. त्यावेळी ते पूर्णिया येथे आयजी होते. राजीनामा दिल्यानंतर त्यांना पूर्णियाहून बिहार पोलिस मुख्यालयात बोलावण्यात आले आणि आयजी ट्रेनिंगची जबाबदारी देण्यात आली. 117 दिवसांनंतर 13 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर गृह विभागाने 14 जानेवारी रोजी या संदर्भात अधिसूचनाही जारी केली.
शिवदीप वामनराव लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात 29 ऑगस्ट 1976 रोजी त्यांचा जन्म झाला. 2 फेब्रुवारी 2014 रोजी ममता शिवतारे यांच्यासोबत ते विवाहबद्ध झाले. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रसेर असतात.












Click it and Unblock the Notifications