LPG सिलिंडरचा तुटवडा? घरगुती गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, वाचा नवे नियम
LPG cylinder shortage new rules 25 days gap booking updates : जागतिक युद्धाच्या छायेमुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून, भारतात आता एलपीजी (LPG) सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण-इस्रायल संघर्ष आणि होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे गॅस आयातीत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या किचनमध्ये गॅसची कमतरता भासू नये म्हणून कठोर पावले उचलली आहेत. आता दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये मोठा गॅप ठेवण्यात आला असून, व्यावसायिक वापरासाठी निर्बंध येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचे नवे नियम आणि उपाययोजना
१. बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर
गॅसचा साठा करून ठेवणे आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने आता दोन रिफिल बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य केले आहे. म्हणजेच, एकदा गॅस मिळाल्यावर तुम्हाला पुढच्या २५ दिवसांनंतरच नवीन बुकिंग करता येईल.
२. घरगुती ग्राहकांना पहिले प्राधान्य
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, उपलब्ध गॅस साठ्यातून सर्वात पहिले प्राधान्य घरगुती गॅस ग्राहकांना दिले जाईल. कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅसची कमतरता भासू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
३. शुद्ध घरगुती उत्पादनावर भर
आयात होणाऱ्या गॅसमध्ये अडथळे येत असल्याने, देशांतर्गत रिफायनरीजना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाढीव उत्पादनाचा पूर्ण हिस्सा केवळ घरगुती वापरासाठी वापरला जाणार आहे.
४. अत्यावश्यक सेवांसाठी राखीव कोटा
आयात केलेला एलपीजी साठा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी राखून ठेवला जाईल. यामध्ये प्रामुख्याने रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल, जेणेकरून सार्वजनिक सेवा विस्कळीत होणार नाहीत.
५. हॉटेल आणि उद्योगांवर गंडांतर?
हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक उद्योगांना आता गॅस मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तेल कंपन्यांच्या तीन कार्यकारी संचालकांची समिती व्यावसायिक क्षेत्रातील गॅस वाटपावर नियंत्रण ठेवणार आहे. घरगुती गरज भागल्यानंतरच उरलेला गॅस व्यावसायिक क्षेत्राला दिला जाईल.












Click it and Unblock the Notifications