ऑनलाइन फसवणुकीला बसणार लगाम! मेटाची 'अँटी-स्कॅम' ढाल; WhatsApp, FB व मेसेंजर आता सुरक्षित!
WhatsApp device linking warning : डिजिटल युगात सोयीसुविधांसोबतच ऑनलाइन फसवणुकीचे (Online Scams) संकटही वेगाने वाढत आहे. वापरकर्त्यांची हीच चिंता ओळखून तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटा (Meta) ने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर स्कॅमर्सना रोखण्यासाठी मेटाने नवीन आणि प्रगत 'अँटी-स्कॅम टूल्स' (Anti-Scam Tools) लाँच करण्याची घोषणा केली आहे. या नवीन फिचर्सचा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना संशयास्पद हालचालींबाबत वेळेत सावध करणे आणि त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हा आहे.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) : डिवाइस लिंकिंगवर आता कडक नजर
व्हॉट्सअॅपवर सध्या 'डिवाइस लिंकिंग'च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. स्कॅमर्स वापरकर्त्यांना भूलथापा देऊन QR कोड स्कॅन करायला लावतात आणि त्यांचे खाते दुसऱ्या डिवाइसवर उघडतात.
नवीन बदल: आता एखादी डिवाइस लिंकिंग रिक्वेस्ट संशयास्पद वाटल्यास व्हॉट्सअॅप वापरकर्त्याला त्वरित 'वॉर्निंग अलर्ट' देईल.
कसा होणार फायदा : हा अलर्ट वापरकर्त्याला ती रिक्वेस्ट कुठून आली आहे याची माहिती देईल, ज्यामुळे फसवणूक होण्यापूर्वीच वापरकर्ता सावध होऊन ती प्रक्रिया थांबवू शकेल.
फेसबुक (Facebook): संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टपासून संरक्षण
अनेकदा अनोळखी प्रोफाइलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केली जाते. मेटा आता अशा प्रोफाइल्स ओळखण्यासाठी नवीन प्रणालीची चाचणी घेत आहे.
अलर्ट सिस्टीम : जर एखाद्या खात्याचे 'कॉमन फ्रेंड्स' कमी असतील किंवा त्याचे लोकेशन संशयास्पद (उदा. दुसऱ्या देशातील) असेल, तर फेसबुक वापरकर्त्याला तात्काळ चेतावणी देईल.
सुरक्षितता : यामुळे वापरकर्त्यांना एखादी रिक्वेस्ट स्वीकारायची की संबंधित अकाऊंट थेट ब्लॉक करायचे, याचा निर्णय घेणे सोपे होईल.
मेसेंजर (Messenger): AI च्या मदतीने स्कॅम ओळखणार
मेसेंजरवर बनावट नोकरीच्या ऑफर्स किंवा लॉटरीचे आमिष दाखवणारे मेसेज मोठ्या प्रमाणात येतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मेटाने प्रगत स्कॅम डिटेक्शन सिस्टीम आणली आहे.
AI रिव्ह्यू : वापरकर्ते आता संशयास्पद मेसेज थेट AI रिव्ह्यू साठी पाठवू शकतील.
मार्गदर्शन : जर तो मेसेज स्कॅम असल्याचे निष्पन्न झाले, तर त्या अकाऊंटला ब्लॉक कसे करायचे किंवा त्याची तक्रार कशी नोंदवायची, याचे मार्गदर्शनही मेसेंजरद्वारे केले जाईल.
आकडेवारी आणि कडक कारवाई
मेटा केवळ नवीन टूल्सच आणत नाही, तर फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करत आहे:
जागतिक स्तरावर: गेल्या वर्षात मेटाने १५९ दशलक्ष हून अधिक फसवणूक करणाऱ्या जाहिराती हटवल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील ९२% जाहिराती कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता सिस्टमने स्वतःहून शोधून काढल्या होत्या.
भारतीय बाजारपेठ: २०२५ मध्ये भारतात फसवणूक करणाऱ्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल १२.१ दशलक्ष जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
'स्कॅम से बचो' मोहीम: जनजागृतीवर भर
तंत्रज्ञानासोबतच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मेटाने इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C) आणि सेबी (SEBI) यांच्या सहकार्याने 'स्कॅम से बचो' मोहिमेचे तिसरे पर्व सुरू केले आहे. या मोहिमेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आणि अनेक प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर्स सहभागी झाले असून, ते लोकांना ऑनलाइन सुरक्षिततेचे धडे देत आहेत.












Click it and Unblock the Notifications