संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं
आपल्या अनोख्या शैलीने आणि विनोदी कौशल्याने लाखो नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करणारा छत्रपती संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपे याचे आज (मंगळवार, १० मार्च २०२६) सकाळी दुःखद निधन झाले. शहरातील बालाजी नगर येथील राहत्या घरात तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

राहत्या घरात आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे आज सकाळी त्याच्या निवासस्थानी अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
'कोण अरुण तुपे'ची एक्झिट; सोशल मीडियावर हळहळ
इन्स्टाग्रामवर 'कोण अरुण तुपे' या नावाने अरुणचे अधिकृत अकाऊंट होते. त्याचे तब्बल १ लाख ७९ हजार (179K) फॉलोअर्स होते. तरुण वर्गात तो कमालीचा लोकप्रिय होता. अरुण केवळ विनोदीच नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवरही मार्मिक टिप्पणी करणारे रील्स बनवायचा. त्याच्या प्रत्येक रीलला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स असायचे. साध्या, घरगुती वातावरणात बनवलेले त्याचे संवाद नेटकऱ्यांना आपलेसे वाटायचे.
मृत्यूच्या २१ तास आधी शेवटचा रील
अरुणच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण मृत्यूच्या अवघ्या २१ तास आधी त्याने आपला शेवटचा रील पोस्ट केला होता. इतकेच नाही तर, निधनाच्या काही तास आधीपर्यंत तो त्या रीलवर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सना उत्तरेही देत होता. त्यामुळे इतक्या कमी वेळात नेमके काय घडले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दरम्यान, अरुणला 'अपस्मार' (फिट येणे) या आजाराचा त्रास होता, अशी प्राथमिक माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. मात्र, मृत्यूचे कारण हेच आहे की आणखी काही, याचा तपास पोलीस करत आहेत.
तरुण कलाकारांच्या निधनाचे सत्र
अरुण तुपेच्या निधनाने पुन्हा एकदा सोशल मीडिया विश्वातील तरुण कलाकारांच्या अकाली एक्झिटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचेही वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी निधन झाले होते. एकामागून एक लोकप्रिय चेहऱ्यांच्या जाण्याने चाहत्यांमध्ये प्रचंड शोक व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications