गेल्यावेळी भाजपने तिकीट कापले, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे निवडून येणार का, जाणून घ्या ग्राउंड रिपोर्ट
Kamptee Assembly 2024 Chandrashekhar Bawankule vs Suresh Bhoyar contest : कामठी विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यात होत असलेली ही थेट लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कामठी मतदारसंघ हा भाजपसाठी गेल्या दोन दशकांपासून मजबूत बालेकिल्ला आहे. बावनकुळे यांनी 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत सलग विजय मिळवला होता. मात्र, 2019 मध्ये उमेदवारी नाकारल्याने बावनकुळे यांना राजकीय संघर्ष करावा लागला. यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन मतदारसंघ जिंकण्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्यावर सोपवली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा संधी देऊन भाजपने प्रतिष्ठेची लढत स्वीकारली आहे. दुसरीकडे, सुरेश भोयर यांनी लोकसभेसाठी घेतलेली मेहनत काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकते. मुस्लीम आणि दलित मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असून, ही निवडणूक कामठीच्या राजकीय भविष्याचा प्रवास ठरवेल.
मतदारसंघाचे राजकीय स्वरूप
कामठी हा शहरी आणि ग्रामीण भागांचा समिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे. येथे दलित आणि मुस्लीम मतदार लक्षणीय आहेत. काँग्रेसला याच मतांवर मोठा विश्वास आहे, तर बावनकुळे यांची पकड ओबीसी मतदारांवर मजबूत आहे. 2019 मध्ये भाजपने उमेदवारी दिलेल्या टेकचंद सावरकर यांनी काँग्रेसपेक्षा फक्त 11 हजार 136 मतांनी विजय मिळवला होता. त्यात बावनकुळे यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपचे मताधिक्य लक्षणीय घटले होते.
काँग्रेसची तयारी
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने कामठीत भाजपपेक्षा सुमारे 18 हजार मतांनी आघाडी घेतली होती. या यशामागे सुरेश भोयर यांचा मोठा वाटा होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी देऊन, मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढवली आहे.
हेही वाचा : येवल्यात छगन भुजबळांना कांदा हसवणार, रडवणार की मनोज जरांगे झुंझावणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
निर्णायक मुद्दे आणि राजकीय समीकरणे
मुस्लीम मतदारांची भूमिका :
मुस्लीम मतदारांची मोठी संख्या काँग्रेससाठी फायद्याची ठरू शकते. मात्र, 19 पैकी 6 मुस्लीम उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजनाची शक्यता आहे.
बावनकुळे यांचा विकास आणि संपर्क :
पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांना लोकांचा पाठिंबा मिळू शकतो.
भाजपच्या योजना आणि बेरोजगारीचा मुद्दा :
भाजपने राज्यातील योजनांना प्रचारात महत्त्व दिले आहे, तर महाविकास आघाडीने बेरोजगारी आणि औद्योगिक विकासाचा अभाव या मुद्द्यांवर प्रचार सुरू केला आहे.

लोकसभा निकालांचा प्रभाव
कामठी विधानसभा मतदारसंघातील 2019 च्या लोकसभा निकालांवर नजर टाकल्यास काँग्रेसने 1,36,342 मते घेत भाजप-शिवसेना महायुतीच्या 1,18,808 मतांवर मोठी आघाडी घेतली होती. यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ जिंकणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
हेही वाचा : हसन मुश्रीफ विजयाची दुसरी हॅट्ट्रिक करणार की समरजित घाडगे बाजी मारणार? वाचा कागलचा ग्राउंड रिपोर्ट












Click it and Unblock the Notifications