विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही: सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार; छगन भुजबळांनी केले स्पष्ट
Chhagan Bhujbal on NCP merger : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चांवर अखेर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. "विलीनीकरणाचा विषय सध्या आमच्या अजेंड्यावर नाही, आमचे पहिले प्राधान्य सुनेत्रा वहिनींना स्थिरस्थावर करणे हेच आहे," असे सांगत भुजबळ यांनी सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे.

विलीनीकरणाचा दावा आणि भुजबळांचे प्रत्युत्तर
शरद पवार गटाने असा दावा केला होता की, १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार होते आणि तशी चर्चा अजित पवारांशी सुरू होती. यावर संताप व्यक्त करत भुजबळ म्हणाले की, "विलीनीकरण, विलीनीकरण काय लावले आहे? हा निर्णय आज, उद्या किंवा दोन महिन्यांनीही घेता येईल. त्यात एवढी घाई कशासाठी?", "सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांना आधी कामाचे स्वरूप समजून घेऊ द्या. तिथे नवीन कॅप्टन आले आहेत, त्यांना स्थिरस्थावर होऊ द्या."
हे ही वाचा : सुप्रिया सुळे भावूक; म्हणाल्या- पवार फॅमिली कठीण काळात, दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच आमची जबाबदारी
सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार, या प्रश्नाचे उत्तर भुजबळांनी दिले आहे. ते म्हणाले की, "सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणे १०० टक्के ठरले आहे. यात आता कोणतीही शंका नाही. पक्षाचे प्रमुख लोक आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्या पुढील धोरणात्मक निर्णय घेतील," असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : शरद पवारांशी चर्चा केली, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई का?; सुनील तटकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका
नरहरी झिरवाळ यांची पाठराखण
विधानसभा उपाध्यक्ष आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणावरही भुजबळांनी भाष्य केले. "प्रकरण पोलिसांकडे आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईलच. मंत्रालयात अनेक लोक काम करतात, कुणी काही केले म्हणजे थेट मंत्र्यांचा संबंध जोडणे चुकीचे आहे. झिरवाळ यांनी स्वतःहून चौकशीत दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, ही बाब त्यांच्या पारदर्शकतेची साक्ष देते, असेही भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा : 'अजित दादा माझ्या धाकट्या भावासारखे होते'; घातपात असेल तर सत्य समोर येईलच-नाना पाटेकर
राजकीय विश्लेषण; विलीनीकरण का रखडले?
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही गट एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भुजबळांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की.
१. अस्तित्वाची लढाई: अजित पवार गटाला आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवायची आहे.
२. नेतृत्व सिद्ध करणे : सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष किती मजबूत राहतो, याची चाचपणी सध्या सुरू आहे.
३. शपथविधीची घाई विरुद्ध विलीनीकरणाची चर्चा: तीन-चार दिवसांत शपथविधी झाला तर त्याला 'घाई' म्हणणारेच विलीनीकरणासाठी का घाई करत आहेत? असा खोचक सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.












Click it and Unblock the Notifications