सुप्रिया सुळे भावूक; म्हणाल्या- पवार फॅमिली कठीण काळात, दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच आमची जबाबदारी
Supriya Sule on Ajit Pawars Demise : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. "पवार कुटुंब सध्या एका अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काळातून जात आहे. दादांचे जाणे ही आमच्यासाठी मोठी हानी आहे, परंतु त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही आता आमची नैतिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन सुळे यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केले.

"आमच्यातील चर्चा आमच्यातच राहिल्या"
अजित पवारांसोबतच्या नात्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "दादा आता आमच्यात नाहीत, त्यामुळे मी जुन्या राजकीय वादांवर किंवा मुद्द्यांवर भाष्य करू इच्छित नाही. ते माझ्यासाठी वडीलधाऱ्या स्थानी होते. आमच्यात वेळोवेळी ज्या काही चर्चा झाल्या, त्या आमच्यातच राहतील. आज आम्ही सर्व कुटुंब म्हणून एकमेकांच्या पाठिंब्याने या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत."
सखोल चौकशीचे आश्वासन आणि रोहितची चिंता
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. आमदार रोहित पवार यांच्या मनातील शंकांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "रोहितची चिंता स्वाभाविक आहे. काय झाले? हे कसे घडले? आपण त्यांना वाचवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. आम्ही सर्वजण आता सरकारी चौकशीच्या अहवालाची वाट पाहत आहोत."
राजकीय मतभेद विसरून सर्वांचा पाठिंबा
संकटाच्या काळात देशातील सर्वच राजकीय नेत्यांनी पवार कुटुंबाला दिलेला आधार महत्त्वाचा असल्याचे सुळे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथ सिंह आणि ओमर अब्दुल्ला यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करून कुटुंबाला धीर दिला. सुप्रिया सुळे यांनी या कठीण प्रसंगी सोबत उभ्या राहिलेल्या सर्व नेत्यांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले.
रेवती आणि सारंगच्या लग्नाची घोषणा
कौटुंबिक आघाडीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी रेवती आणि सारंगच्या लग्नाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात. मला सहा भाऊ आहेत आणि त्या सर्वांनी या नात्याला मनापासून आशीर्वाद दिला आहे. दुर्दैवाने 28 जानेवारीला दादांचे निधन झाले, अन्यथा 30 तारखेला संपूर्ण कुटुंब अधिकृत घोषणा करणार होते. तरीही, दादांच्या हयातीत या लग्नाला त्यांचा होकार आणि आशीर्वाद मिळाला, हे मी माझे भाग्य समजते."
दादांचे 'AI' आणि कृषी क्षेत्रातील स्वप्न
केंद्रीय अर्थसंकल्पात एआय (Artificial Intelligence) वर दिलेल्या भराबाबत बोलताना त्यांनी अजित पवारांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. दादांच्या हयातीत कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी आणि संबंधित उद्योगांसाठी ५०० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. पुण्यात पार पडलेले 'कृषक' प्रदर्शन हे दादांचे स्वप्न होते. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणे ही त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
व्यापार करारावर रोखठोक मत
भारत सरकारने केलेल्या नवीन व्यापार करारावर भाष्य करताना त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली. "शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर आम्ही नक्कीच आनंदी आहोत. पण या करारातून भारताला प्रत्यक्षात काय मिळणार, हे सरकारने स्पष्टपणे जनतेसमोर मांडायला हवे," असे त्या म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications