India vs England : मोहम्मद सिराजची कमाल! ओव्हल कसोटीत भारताचा थरारक विजय; मालिका 2-2 ने बरोबरीत
India vs England Test Match 2025, Oval Test Match : इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील ओव्हल येथे झालेली शेवटची कसोटी भारतीय संघाने थरारक पद्धतीने जिंकली.या विजयासह भारताने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
शेवटच्या दिवशी 4 विकेट शिल्लक असताना इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव 354 धावांवर संपुष्टात आला. भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.

सिराज ठरला विजयाचा शिल्पकार
सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी केवळ 35 धावांची गरज असताना, इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचल्याचे दिसत होते. परंतु, मोहम्मद सिराजने आपल्या धारदार गोलंदाजीने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.
त्याने 3 विकेट घेत इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या डावात एकट्या सिराजने ५ विकेट घेतल्या, ज्यामुळे इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळणे शक्य झाले.
कसा रंगला सामन्याचा थरार!
नाणेफेक : इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिला डाव : भारताने 224 धावा केल्या, तर इंग्लंडने 247 धावा करून 23 धावांची आघाडी घेतली.
दुसरा डाव : या पिछाडीनंतर भारताने दुसऱ्या डावात जोरदार फलंदाजी करत 296 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 274 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
इंग्लंडचा दुसरा डाव : इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 300 धावा केल्या होत्या आणि हॅरी ब्रूकने शतकही पूर्ण केले होते. मात्र, तो बाद झाल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर इंग्लंडने उर्वरित 8 विकेट्स केवळ 54 धावांत गमावल्या आणि त्यांचा डाव 354 धावांवर संपला.
शेवटी, गस ॲटकिन्सन आणि जोश टोंग यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण मोहम्मद सिराजच्या शेवटच्या विकेटने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुखापतग्रस्त ख्रिस वोक्सनेही फलंदाजी केली, पण तो संघाला वाचवू शकला नाही.
मालिका 2-2 अशी बरोबरीत
या विजयासह भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. भारताने दुसरी आणि पाचवी कसोटी जिंकली, तर इंग्लंडने पहिली आणि तिसरी कसोटी जिंकली. चौथी कसोटी अनिर्णित राहिली होती. ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप रोमांचक ठरली आणि शेवटपर्यंत विजयासाठी संघर्ष सुरू होता.
- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 9 फलंदाजांनी एका मालिकेत 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
- सध्याच्या मालिकेत भारताच्या 5 आणि इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
- कसोटी इतिहासातील ही दुसरी मालिका आहे ज्यामध्ये 7 हजारांहून अधिक धावा झाल्या आहेत.
- यापूर्वी 1993 च्या अॅशेस मालिकेत 7,222 धावा झाल्या होत्या. त्या मालिकेत 6 सामने खेळले गेले होते.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारताची टीम
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंडची टीम
ऑली पोप (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.












Click it and Unblock the Notifications