चर्चा तर होणारचं; बारामतीच्या निवडणुकीची चर्चा थेट परदेशात
मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले.नरेंद्र मोदींनी तिस-यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या लोकसभा निवडणुकीची चर्चा गावागावत झाली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघाची.

या मतदार संघात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली. या लढतीत सुळे यांनी १ लाख ५३ मतांनी विजय मिळवत त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.
या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला चांगलाच फटका बसला. 2019 च्या तुलनेत युतीच्या 25 जागा या निवडणूकीत कमी झाल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. यामध्ये भाजपला केवळ 9 जागांवर विजय मिळाला असून 2019 च्या तुलनेत भाजपच्या 13 जागा कमी झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत असणारी निवडणूक म्हणजे बारामती. याच निवडणुकीची थेट रशियातही चर्चा झाली, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सांगवीतील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी काय चर्चा झाली,यासंदर्भात पवारांनी त्यांच्या एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट टाकली आहे. या संवादादरम्यान केलेल्या विधानांचा या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.
शरद पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्ट म्हणतात...
बारामती तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सांगवी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. एक काळ असा होता की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींना सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा… pic.twitter.com/PCZxmG6p1L
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 19, 2024
बारामती तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सांगवी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. एक काळ असा होता की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींना सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला, सांगवीच्या विकासामध्ये सहकार्य केलं.
या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बंधारे बांधण्याचे काम सांगवीपासून सुरू झाले. नंतरच्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना असो, अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यांमध्ये सांगवीचा मोठा वाटा होता. सांगवीने नेतृत्व सुद्धा केलं. या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी सांगवीची मदत नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे सांगवीचं सबंध भागामध्ये नावलौकिक आहे.
मोठ्या मतांनी जवळपास ४०-४५ हजारांच्या फरकाने सुप्रियाला तुम्ही विजयी केलं. मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की, देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचे नाव तुमचे नवे खासदार, तुमचे खासदार हे त्याठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला त्याचे समाधान मिळेल.
"सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही"
मी बऱ्याच दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय. लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला. झालं ते विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट ज्यांनी बारामती तालुक्यात सिद्ध केली नेते गावातले होते त्यांचं दुकान काही चाललं नाही.
सामान्य माणसं जी आहेत, साधी माणसं आहेत, लहान शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन पिढी, तरुणांची पिढी ही पुढे आली. या तरुणांच्या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल? प्रश्न कसे सुटतील? याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल. या सगळ्या तरुण पिढीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं, त्यांच्या पाठीशी उभे राहणं या कामात आम्हा लोकांचे लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो.
"रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची"
तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होतं. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्याचं नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले गावामध्ये तुमच्या निवडणुकी झाल्या त्याची काय पद्धत असते? रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथे आला आहे रशियावरून. काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली, तो एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला. त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो.












Click it and Unblock the Notifications