...तर तुमची जीभ हासडू, NCP आमदाराचा थेट संजय राऊतांना इशारा; नेमका कशावरुन रंगला वाद?
sanjay Raut Vs Ajit Pawar : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून सुरू झालेला वाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच पेटला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'अर्धे पाकिस्तानी' संबोधल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

राऊतांच्या वक्तव्यावर नायकवाडींची तीव्र प्रतिक्रिया
इद्रिस नायकवाडी यांनी संजय राऊत यांच्यावर थेट हल्ला चढवला. राऊतांना उद्देशून ते म्हणाले, "ज्याला सगळे भोंगा म्हणतात... संजय राऊत यांनी अजित पवारांबद्दल फार खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली."
नायकवाडी यांनी राऊत यांच्या पूर्वीच्या वक्तव्याची आठवण करून दिली. एक महिन्यापूर्वीच राऊत यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यास योग्य नेते आहेत, असे म्हटले होते. आता अचानक अशाप्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अशोभनीय आहे, असे नायकवाडी म्हणाले.
'संजय राऊतांचीच डीएनए चाचणी करा'
नायकवाडी यांनी राऊतांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांचीच डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, "नेत्याच्या अंगात अमुक अमुक रक्त आहे, असे बोलणे अत्यंत अशोभनीय आहे. यापेक्षा आता संजय राऊत यांच्या डीएनएची तपासणी करण्याची आवश्यकता आहे." नायकवाडी यांनी त्यांच्याकडेही राऊतांचे काही 'रिपोर्ट' असल्याचा दावा केला, पण वैयक्तिक पातळीवर टीका करणे हे आपले धोरण नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच, अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असेही ते म्हणाले.
'पुन्हा बोलाल तर जीभ हासडू'
संजय राऊत यांनी अजित पवार यांना 'अर्धे पाकिस्तानी' संबोधल्याने इद्रिस नायकवाडींचा पारा चांगलाच चढला. "पाकिस्तानशी जोडून आमच्या नेत्यावर भाष्य करणे त्यांना शोभत नाही. जर संजय राऊत यांनी हा धंदा बंद केला नाही, अजितदादांबाबत एक शब्द जरी काढला, तर आमचे कार्यकर्ते त्यांची जीभ हासडून दाखवतील," असा थेट इशारा त्यांनी दिला. अशा पद्धतीची 'घाणेरडी वक्तव्ये' राऊतांना पुन्हा करता येणार नाहीत, आणि त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे नायकवाडी यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत नेमके काय म्हणाले होते?
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अजित पवार यांनी 'खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पाहावे' असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. राऊत म्हणाले होते, "ते मूर्ख राजकारणी आहेत. ते अर्धे पाकिस्तानी आहेत. ते पाकड्या आहेत. जर महाराष्ट्राच्या मंत्र्यांची ही भाषा असेल, तर ती राष्ट्रभक्ताची भाषा नाही. कळलं अजित पवार? जे 26 लोक गेले (पहलगाम हल्ल्यातील), त्यांच्यात तुमच्या घरातील कोणी असते तर तुम्ही असं बोलला नसता."
संजय राऊत यांच्या याच टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आता वैयक्तिक हल्ल्यांच्या पातळीवर पोहोचले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications