Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Rain: मराठवाड्यावर पुन्हा आभाळ फाटलं! गोदावरीला महापूर, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना इशारा!

Maharashtra Heavy Rain Godavari River Floods : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. आधीच पुराच्या तडाख्याने हैराण झालेल्या मराठवाड्यावर पुन्हा एकदा आभाळ फाटल्याचे चित्र आहे. गोदावरी नदीला महापूर आल्याने छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईसह नाशिक, पालघर, रायगड, परभणी, धाराशिव, अहमदनगर, बीड, हिंगोली, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये धाकधूक वाढली आहे. प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra Rain

गोदावरीला महापूर: मराठवाडा जलमय

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून उगम पावणारी ही नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला, आणि पुढे छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेड जिल्ह्यातही पाऊस सुरू असल्याने पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

छत्रपती संभाजीनगरातील पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने, धरणाचे २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या जायकवाडीतून १ लाख ९८ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेडमध्ये पूर

गोदावरीला आलेल्या महापुरामुळे नांदेड जिल्ह्यातही नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचले असून अनेक गावे जलमय झाली आहेत.

परभणीलाही फटका

परभणी जिल्ह्यातील गोदावरीसह पूर्णा आणि दुधना या तिन्ही नद्यांना पूर आला आहे. येलदरी धरणातूनही पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पाणी साचले, पश्चिम उपनगरे प्रभावित

मुंबईच्या पश्चिम उपनगरात रविवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व भागांमध्ये संततधार सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिक, पालघर, रायगडमध्ये पावसाचा कहर!

राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मनमाड शहर आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने कहर केला. पांझण आणि राम गुळणा नद्यांना या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. गुरुद्वाऱ्यामागील वस्ती, गवळी वाडा, ईदगाह, टक्कार मोहल्ला या भागातील घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. पुरात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरक्षित स्थळी हलवले.

Maharashtra Rain

पालघरमध्ये धरणे भरली

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण १०० टक्के भरले असून, कवडास धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले असून, धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत ४७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगडला रेड अलर्ट

रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी दक्षिण भागात आणि रविवारी उत्तर भागात पावसाचा जोर वाढला. कर्जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे नगरपालिका परिसरामध्ये पाणी साचले आहे, तर उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

इतर जिल्ह्यांमधील स्थिती

धाराशिवमध्ये पूर जैसे थे

धाराशिव जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी, नद्यांमधील पूरस्थिती कायम आहे. तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने तेरणा नदीकाठच्या पाडोळी गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. आतापर्यंत तीन वेळा या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

अहमदनगरमध्ये पुराचा तडाखा

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शेवगावमध्ये सूर्यकांता नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. एका कारचालकाने पाण्यातून गाडी नेण्याचा प्रयत्न केला असता, गाडी अर्ध्याहून अधिक बुडाली. गाडीतील प्रवासी कसेबसे छतावर चढले. स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले, मात्र शेवगाव तालुक्याचा संपर्क तुटला असून, सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.

बीड-हिंगोलीत सोयाबीन पाण्यात

बीड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक पाण्यात गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर हाती येणारे पीक वाया गेल्याने मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

यवतमाळमध्ये घरांत पाणी

यवतमाळच्या आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका बसला आहे. मोबीनपुरा, शास्त्रीनगर आणि झोपडपट्टी परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरला असला तरी काही भागात अजूनही पाणी साचले आहे.

जळगावात सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाच्या माणिकपुंज प्रकल्पात पाण्याची वाढ झाली आहे. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील या गंभीर पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+