2100 रुपये देणार असे CM म्हटलेच नाही, आदिती तटकरे सभागृहात हे काय बोलून गेल्या, विरोधक संतप्त
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेवरील प्रश्नोत्तर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी मंत्री आदिती तटकरे यांना चांगलेच धारेवर धरले. तर आदिती तटकरे यांनी देखील त्यांच्या सर्व आरोपांना खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यात आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणींना 2100 रुपये आत्ताच देणार असे मुख्यमंत्री म्हटलेले नाही, असे विधान केल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर.
काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
देवेंद्र फडणवीस यांनी बजेटच्या वेळी 2100 रुपये घोषित करू असे वक्तव्य केले नाही. 100 टक्के आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. पाच वर्षांसाठी जाहीरनामा तयार केलेला असतो. मंत्रिमंडळ जेव्हा तसे सूचित करेल तेव्हा आमच्या खात्याकडून तसा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली आहे.

विरोधकांकडून सातत्याने योजनेवर टीका
अदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून योजनेवर टीका सुरू आहे. ही योजना लाडक्या बहिणींची सर्वात आवडती योजना ठरली. म्हणून कुठेतरी पहिल्या महिन्यात पावणेदोन कोटी महिलांना लाभ मिळाला. तर निवडणुकीनंतर 2 कोटी 45 लाख महिलांना लाभ मिळाला. तर आता 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ देणार आहोत. आम्ही निवडणुकीच्या आधी वेगळी निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेत नाही.
राजकीय हेतू ठेवत ही योजना- सतेज पाटील
यावर बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, योजना सुरू करताना राज्य शासनाने 10 जीआर काढले. तेव्हा राजकीय हेतू ठेवत ही योजना सुरू केली हे सर्वांना माहिती आहे. योजना करताना विचारपूर्वक निर्णय झाला नाही. राजकीय हेतू ठेवत निर्णय घेण्यात आला.
निकष पहिल्यापासूनच- सतेज पाटील
सतेज पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून ही योजना काढण्यात आला. बहिणींवर प्रेम म्हणून ही योजना काढण्यात आली नाही. मंत्री आज जे निकष सांगत आहेत ते पहिल्यापासून होते. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती. ज्यांना अपात्र करताय त्यांची फसवणूक केली जात आहे.
..तर पुढील वर्षभराचे अनुदान एकदाच द्या- सतेज पाटील
सतेज पाटील म्हणाले की, पुढचे अनुदान आधी मिळेल अशी एकही योजना राज्यात नाही. पण लाडक्या बहीनींला निवडणुकीपूर्वी 2 महिन्याचे अनुदान दिले. राज्यातील मते मिळावे म्हणून हे सर्व केले. गतिमान सरकार असेल तुमच्यात ताकद असेल तर पुढील वर्षभराचे अनुदान एकदाच द्या, असा टोलाही त्यांनी सराकारला लगावला आहे. निकाल लागला की अनुदान थांबवण्याचे काम केले गेले.












Click it and Unblock the Notifications