World Kidney Day 2026 : किडनी फेल होणार नाही यासाठी 'ही' काळजी घ्या; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
world kidney day 2026 symptoms prevention tips marathi : मानवी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्याचे महत्त्वाचे काम 'किडनी' (वृक्क) करते. मात्र, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा 'जागतिक किडनी दिन' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १२ मार्च २०२६ रोजी हा दिवस पाळला जात आहे.

यावर्षीची थीम (विषय)
२०२६ साठी जागतिक किडनी दिनाची थीम "Kidney Health for All: Caring for People, Protecting the Planet" अशी आहे. याचा अर्थ किडनीचे आरोग्य केवळ व्यक्तीशी नाही, तर पर्यावरणाशीही जोडलेले आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यांचाही परिणाम किडनीवर होत असल्याने निसर्ग जपण्याचा संदेश यातून दिला जात आहे.
सावधान! ही आहेत किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे
बोल्ड स्कायनुसार, किडनीचा आजार हा 'सायलेंट किलर' मानला जातो, कारण सुरुवातीला याची लक्षणे चटकन जाणवत नाहीत. खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- लघवीमध्ये बदल: लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा रात्री वारंवार लघवीला जावे लागणे.
- सूज येणे: पाय, घोटा किंवा डोळ्यांखाली सतत सूज जाणवणे.
- अशक्तपणा: रक्तातील टॉक्सिन्स वाढल्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा वाटणे.
- त्वचेला खाज सुटणे: किडनी नीट काम करत नसल्यास रक्तात खनिज आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडून खाज सुटते.
- भूक न लागणे आणि उलट्या: अन्नावरची वास उडणे किंवा मळमळल्यासारखे वाटणे.
- लघवीतून रक्त किंवा फेस येणे: हे किडनीला इजा झाल्याचे गंभीर लक्षण असू शकते.
किडनी निकामी होण्याची प्रमुख कारणे
- १. मधुमेह (Diabetes): रक्तातील साखर वाढल्याने किडनीच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
- २. उच्च रक्तदाब (High BP): किडनीच्या नसांवर ताण आल्याने गाळण्याची प्रक्रिया मंदावते.
- ३. पेनकिलर्सचा अतिवापर: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणे घातक ठरू शकते.
- ४. पाण्याचे कमी प्रमाण: शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यासाठी पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे आहे.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी 'हे' ५ उपाय करा
- पाणी भरपूर प्या: दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
- मीठ कमी खा: आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील.
- नियमित व्यायाम: वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रक्तभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे.
- साखर तपासा: जर तुम्हाला मधुमेह असेल, तर दर सहा महिन्यांनी 'किडनी फंक्शन टेस्ट' (KFT) करून घ्या.
- व्यसनांपासून दूर राहा: धुम्रपान आणि अल्कोहोलमुळे किडनीच्या रक्तवाहिन्यांना गंभीर इजा होते.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्टचा (किडनी तज्ज्ञ) सल्ला आवर्जून घ्या.












Click it and Unblock the Notifications