Breakup Day 2025 : ब्रेकअप..नैराश्य अन् मानसिकतेवर कसा होतो परिणाम, उपाय काय, जाणून घ्या सविस्तर
Breakup Day 2025 : जेव्हा दोन लोक एकत्र येतात तेव्हा सुरुवातीला ते एकमेकांसोबत आपल्या भावभावना व्यक्त करत असतात. अतिशय महत्त्वाच्या जीवनातील कामांना बाजूला सारून ते त्या व्यक्तीसाठी खूप मोठा वेळ देतात. एकत्र येणे, सोबत राहणे, जेवण सोबत करणे, सुख दुख एकमेकांना शेअर करणे, पर्यटनाला जाणे यासह अनेक बाबींची अनुभवाची शिदोरी ते घेत असतात. परंतु, नात्यामध्ये अशी एक वेळ येते, तेव्हा ते एकमेकांना नकोसे वाटायला लागतात. आणि अखेर त्यांच्यामध्ये निर्माण होतो तो दुरावा. अर्थात ब्रेकअप होते.
ब्रेकअपचा आपल्या मानसिकतेवर देखील वाईट परिणाम व्हायला लागतो. कधीकधी या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी महिनोंमहिने लागतात तर कधी कधी वर्षानुवर्षे जातात. तर अनेक लोक वेडे देखील झाल्याची उदाहरणे आपण समाजात पाहत असतो. आज 21 फेब्रुवारी ब्रेकअप डे म्हणून मानला जातो. आजच्या ब्रेकअप डे निमित्त ब्रेकअप झाल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, काय करावे, जीवनात काय बदल केले पाहिजे तर काही लक्षणे जर वारंवार काही लक्षणे दिसून येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे किती गरजेचे आहे, यावर आपण जाणून घेणार आहोत...!

सर्वात आधी जाणून घेऊया, ब्रेकअप का होतात?
नात्यातील कोणासाठीही ब्रेकअप सोपे नसते. त्यांचे नाते संपुष्टात आलेले पाहणे कोणालाही आवडत नाही. यातून जाणाऱ्या जोडप्यांसाठी हा खूप कठीण अनुभव आहे. तथापि, ब्रेकअपमागे अनेक कारणे असू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांवरील विश्वास संपणे, एकमेकांना योग्यरित्या समजून न घेणे, यासह ब्रेकअपची अनेक कारणे आहेत.
ब्रेकअपचे प्रमुख कारणं...!
- जोडीदाराची फसवणूक
- नात्यात विश्वासाचा अभाव
- गैरसमज निर्माण होतात
- नात्यात दुरावा
- कमी लेखणारा जोडीदार
- आर्थिक आणि कौटुंबिक समस्या
- एकमेकांवर संशय घेण्याची सवय जडणे
- व्यसनाधिनता
- मानसिक आरोग्य स्थितीमुळे
ब्रेकअपमधून बाहेर पडणे सोपे का नाही?
ब्रेकअपमधून बाहेर पडणे बहुतेक लोकांसाठी आव्हानात्मक असते. खरंतर, आयुष्याच्या या कठीण टप्प्यात एकाच वेळी अनेक भावना उदयास येत असतात. जसे की दुःख, चिंता, राग, धक्का, वेदना, गोंधळ, संताप, भावनिक अशांतता आणि कधीकधी मत्सर देखील. ही अशी स्थिती आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसारख्या इतर नात्यांपासून दूर राहू इच्छिते. तो नेहमीच त्याच्या जोडीदाराच्या आठवणींमध्ये हरवलेला राहू शकतो. तथापि, यावर मात करण्यासाठी, त्याला स्वतः पुढे पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठी तो त्याच्या मित्रांची मदत घेऊ शकतो.

ब्रेकअपचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो
नात्याचा अंत केवळ आर्थिक आणि राहणीमानात मोठे बदल घडवून आणत नाही. तर भावनिक अशांतता देखील निर्माण करतो. काही लोक लवकरच सर्वकाही विसरून पुढे जातात. परंतु या प्रकरणात बहुतेक लोक अत्यंत दुःखी आणि चिंताग्रस्त झालेले असतात. यापैकी काही लोकांसाठी, ब्रेकअप तणाव, चिंता आणि नैराश्याचे कारण बनते.
नैराश्याची ही आहेत प्रमुख लक्षणे..!
ब्रेकअपनंतर दुःखाच्या भावना सौम्य ते तीव्र असू शकतात. कधीकधी या भावना आपल्याला व्यापून टाकतात आणि बराच काळ राहतात. जर ही लक्षणे साधारणत: दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर ती नैराश्य असू शकते.
ब्रेकअप नंतर नैराश्याची प्रमुख लक्षणे ही आहेत...!
- नित्य कामाबद्दलचे स्वारस्य हळूहळू कमी होणे
- एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत होत नाही
- काही गोष्टी आठवत नाही, निर्णय घेता येत नाही
- कायम चिंताग्रस्त असणे तसेच उदास राहणे
- चिडचिडपणा वाढणे व अस्वस्थ वाटणे
- रात्री नीट झोप न येणे, भयानक स्वप्न पडतात
- नेहमी थकवा वाटणे किंवा कायम सुस्त राहणे
- आत्महत्यासारखा विचार येणे किंवा स्वत:ला दुखात टाकणे
ब्रेकअपनंतर आलेल्या नैराश्यावर कशी मात करावी?
ब्रेकअपनंतर आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, स्वतःला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, त्यात नियमितपणे व्यायाम करणे, माइंडफुलनेस किंवा ध्यान करणे आणि पुरेशी झोप आणि आहार घेणे समाविष्ट आहे.
नैराश्यावर उपचार न केल्यास काय होते?
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीच्या ब्रेकअप डिप्रेशनवर उपचार केले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आत्महत्येसारखे पाऊल देखील उचलू शकतो. त्यामुळे योग्यवेळी उपचार घेतले जावेत, असा सल्ला त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications