WTC Points Table : पर्थमधील विजयानंतर भारताला मोठा फायदा, अंतिम फेरीत प्रवेश?
WTC Points Table update: पर्थ येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या शानदार विजयाने भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) शर्यतीत कायम राहिला आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आता पुढील तीन सामने जिंकावे लागणार आहेत .
या विजयाचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला मिळाला. या विजयामुळे भारताला मालिकेत आघाडी तर मिळालीच, पण कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची आशाही कायम आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. भारताची गुणांची टक्केवारी आता 61.11 आहे, जी पूर्वी 58.33 होती.

असा मिळेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश
आजच्या विजयामुळे भारताने आपली स्थिती आणखी मजबूत केली असून आता WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. त्याच वेळी ऑस्ट्रेलिया 13 सामन्यांतील चौथ्या पराभवासह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांच्या गुणांची टक्केवारी आता 57.69 झाली आहे. भारताचा 15 सामन्यांमधला हा नववा विजय होता, ज्यानंतर भारताच्या खात्यात एकूण 110 गुण झाले आहेत.
भारताची स्थिती जाणून घ्या
पॉइंट टेबलमध्ये भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका (55.56 गुण टक्के) आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे न्यूझीलंड (54.55) आणि दक्षिण आफ्रिका (54.17) आहेत. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली.
भारताचा दणदणीत विजय
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 104 धावांत गुंडाळला गेला. भारताला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने आपला दुसरा डाव 6 बाद 487 धावा करून घोषित केला. या घोषणेसह भारताला एकूण 533 धावांची आघाडी मिळाली, जे ऑस्ट्रेलियासाठी मोठे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 238 धावांवर ऑल आऊट झाला आणि भारताने 294 धावांनी कसोटी सामना खिशात घातला आहे.












Click it and Unblock the Notifications