भारतीय संघ महिला T20 विश्वचषकातून बाहेर? उपांत्य फेरी गाठता येईल का काय आहेत समीकरणे? वाचा
Women's T20 World Cup 2024 : महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रात्री झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रोलियाकडून थोडक्यात पराभव स्विकारावा लागला. भारताने दमदार सुरुवात केल्यानंतर अखेरच्या काही षटकांत हाराकीरी झाली आणि तिच पराभवाला कारणीभूत ठरली. आता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला का.. सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहचणार का हे प्रश्न आहेत.
महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत विरुद्ध आस्ट्रोलिया हा रोमांचक सामना रविवारी 13 ऑक्टोबर रोजी झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करुन भारतीय महिला संघाला 152 धावांचे आव्हान दिले. पाठलाग करण्याचा प्रयत्नात भारताने आपल्या नऊ विकेट्स गमावल्या आणि 9 धावांनी सामना गमावला. भारतीय संघ निर्धारित षटकात 9 गडी गमावून केवळ 142 धावा करू शकला.

भारतीय महिला संघाची फलंदाजी ढेपाळली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने एकूण 151/8 धावा केल्या. भारतीय संघ निर्धारित 20 षटकात 142/9 धावाच करू शकला. या सामन्यात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली. पण भारतीय महिला फलंदाज सामन्याचे शेवटचे तीन षटकात सुमार कामगिरी केली. आपल्या विकेट्स त्या देऊन बसल्या सुमार फटके, धाव घेताना नसलेले नियोजन याचा फटका बसला आणि पराभवाचे तोंड पाहावे लागले.
आस्ट्रोलियाची टिच्चून गोलंदाजी
जेव्हा ऑस्ट्रोलियन संघ विजयासाठी लढतो तेव्हा त्यांच्यातील विजयाची जिद्द दिसते. या सामन्यातही तेच झाले सामन्याच्या 19 व्या षटकात तब्बत तीन विकेट्स भारताने गमावल्या. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियासाठी, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी फलंदाजीत योगदान दिले आणि अनुक्रमे 40, 32 आणि 32 धावा केल्या. रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजी आक्रमणाने प्रत्येकी 2 बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला काही प्रमाणात रोखून ठेवले.
हरमनप्रीत कौरचे अर्धशतक
भारतीय संघाच्या वतीने कर्णधार हरमनप्रीत कौरने 47 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 54 धावांची आक्रमक खेळी केली आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील तिचे 14 वे अर्धशतक झळकावले. या कामगिरीसह ती T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकं (4) झळकावणारी खेळाडूही ठरली. तिने सुझी बेट्स आणि हेली मॅथ्यूजला मागे सोडले. मात्र, तिचा एकाकी संघर्ष भारताला विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेसा नव्हता. अखेरच्या षटकात एक चेंडू वगळता तिला स्ट्राईकच मिळाली नाही
आता सेमीफायनलमध्ये कसे पोहचणार?
भारताची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आता शिल्लक आहे. संघाचे भवितव्य पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या हातात आहे, ज्यांना त्यांच्या अंतिम साखळी सामन्यात न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला पराभूत करावे लागेल किंवा किमान कठीण आव्हान द्यावे लागेल. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. जर पाकिस्तान जिंकला तर भारताची सेमीफायनलची वाट सुकर होऊ शकते.
कारण पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध जिंकल्यास तिन्ही संघ बरोबरीत राहतील, त्यामुळे नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. पण न्यूझीलंड हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर भारत विश्वचषकातून बाहेर पडेल. भारत सध्या +0.322 च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड +0.282 च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय संघाचे भविष्य पाकिस्तान -न्युझीलंड सामन्यावर अवलंबुन आहे.












Click it and Unblock the Notifications