टीम इंडियाला 'टेन्शन'! अभिषेकची प्रकृती बिघडली; PAKविरुद्धच्या महामुकाबल्याला मुकणार? धाकधूक वाढली
Abhishek Sharma Health Update : टी-20 विश्वचषक 2026च्या रणधुमाळीत भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. 15 फेब्रुवारीला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी अभिषेकच्या आजारपणामुळे भारतीय गोटात खळबळ उडाली असून चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढले आहेत.

सराव सत्रातून अभिषेकची दांडी
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्धच्या सामन्याची तयारी भारतीय संघ करत आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या सराव सत्रात अभिषेक शर्मा अनुपस्थित होता. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी पत्रकार परिषदेत याला दुजोरा दिला.
त्यांनी सांगितले की, अभिषेकला अद्याप पोटाशी संबंधित समस्या जाणवत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तो सरावासाठी मैदानात उतरला नाही. तरीही, दोन दिवसांनंतर होणाऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे.
PAKविरुद्धच्या सामन्यावर टांगती तलवार?
भारतीय चाहत्यांसाठी खरी चिंता नामिबियाविरुद्धचा सामना नसून, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना आहे. अभिषेक शर्माची अनुपस्थिती टीम इंडियाच्या संतुलनासाठी मोठा धक्का ठरू शकते.
आक्रमक सलामी: शाहीन आफ्रिदी आणि सलमान मिर्झा यांसारख्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांवर सुरुवातीच्या षटकांत दबाव टाकण्यासाठी अभिषेकची 'फिअरलेस' फलंदाजी महत्त्वाची आहे.
डाव्या हाताचे कॉम्बिनेशन : टॉप ऑर्डरमध्ये डावखुरा फलंदाज असल्याने विरोधी गोलंदाजांची लय बिघडवण्यास मदत होते.
गोलंदाजीचा पर्याय : कोलंबोची खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याने, अभिषेकची डावखुरी फिरकी कर्णधार सूर्यासाठी 'ट्रम्प कार्ड' ठरू शकते.
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापासून सुरू झाला त्रास
अभिषेकच्या प्रकृतीचा त्रास अमेरिकेविरुद्धच्या सामन्यातच दिसून आला होता. त्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता आणि त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नव्हता. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या आजाराबाबत प्राथमिक माहिती दिली होती.
भारताचा 'बॅकअप प्लॅन' काय असेल?
वैद्यकीय पथक अभिषेकला तंदुरुस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, जर तो १५ फेब्रुवारीपर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर भारताला पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा लागेल, जसे की, इशान किशनसोबत संजू सॅमसनला सलामीला पाठवले जाऊ शकते. मधल्या फळीतील तिलक वर्माला वरच्या क्रमांकावर खेळवून संघाची फळी बदलली जाऊ शकते. सलामीवीर बदलल्यास मधल्या फळीतील खेळाडूंच्या क्रमांकावरही त्याचा परिणाम होईल, जे पाकिस्तानसारख्या मोठ्या सामन्यात धोकादायक ठरू शकते.












Click it and Unblock the Notifications