मोदींच्या 'ऑपरेशन सिंदूर' ट्वीटवर सूर्यकुमार यादवची खास प्रतिक्रिया; म्हणाला- फ्रंटफूटवर बॅटिंग...
Suryakumar Yadav on PM Modi Tweet : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत नवव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिलक वर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे भारताने हा विजय सहज मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर केवळ क्रिकेट वर्तुळातच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही मोठी चर्चा झाली.
भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत संघाचे अभिनंदन केले होते. मात्र, त्यांच्या ट्वीटमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' या शब्दाचा उल्लेख होता, ज्यामुळे पाकिस्तानला हा उल्लेख खटकला आणि एक नवा वाद सुरू झाला. या वादावर आता टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'नेते फ्रंटफूटवर बॅटिंग करतात, हे पाहून चांगलं वाटलं!'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि त्यांच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या उल्लेखावर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने महत्त्वपूर्ण विधान केले:
"चांगलं वाटलं जेव्हा देशाचे नेते फ्रंटफूटवर येऊन बॅटिंग करत आहेत. हे असं आहे, तेच स्वतः स्ट्राईक घेत धावा करत आहेत. हे पाहून चांगलं वाटलं, आणि जेव्हा सर पुढे उभे असतील, तेव्हा निश्चितपणे खेळाडू मोकळेपणानं खेळतील."
सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे. पंतप्रधानांसारखे देशाचे नेतृत्व खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट मैदानात उतरल्याप्रमाणे (ट्वीटद्वारे) उभे राहिल्यास, खेळाडूंना अधिक आत्मविश्वास मिळतो. या अप्रत्यक्ष उत्तरामुळे त्याने मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
#WATCH | Dubai, UAE: On PM Modi's tweet "Operation Sindoor on the games field", Indian skipper Suryakumar Yadav says, "It feels good when the country's leader himself bats on the front foot; it felt like he took the strike and scored runs. It was great to see, and when the sir is… pic.twitter.com/nLLsgwuqPI
— ANI (@ANI) September 29, 2025
मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत शुभेच्छा
भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात ५ विकेट्सनी पराभूत करून जेतेपद जिंकले. या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही आणि पाकिस्तानला तिन्ही सामन्यांमध्ये धूळ चारली. भारताच्या या निर्विवाद विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले होते.
"ऑपरेशन सिंदूर खेळाच्या मैदानात, निकाल सारखाच, भारताचा विजय. आपल्या क्रिकेटपटूंना शुभेच्छा"
मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्यावर सूर्याचे मत
भारताने अंतिम सामना जिंकल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला होता.
या वादावर सूर्यकुमार यादवने अत्यंत व्यावहारिक मत मांडले. "मी याला वाद म्हणणार नाही. लोकांनी ट्रॉफीचे फोटो इथे-तिथे पोस्ट केले आहेत. मात्र, खरी ट्रॉफी तेव्हा असते जेव्हा तुम्ही लोकांचं मन जिंकता. जे लोक पडद्याच्या मागं काम करतात ते खरे ट्रॉफी आहेत. खरी ट्रॉफी मैदानावर या सर्व लोकांचं काम आणि प्रयत्न आहे.
मानधन दान करण्याचा निर्णय
या विजयाच्या निमित्ताने सूर्यकुमार यादवने एक अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. त्याने आशिया कपमधून मिळालेले पूर्ण मानधन भारतीय सैन्य दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने 'एक्स'वर पोस्ट करत ही माहिती दिली. हा निर्णय त्याच्या नेतृत्वाची आणि सामाजिक जाणीवेची प्रचिती देतो.
एकंदरीत, भारताच्या या विजयाने केवळ आशिया चषक जिंकला नाही, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाने राजकीय संदेशाला आत्मविश्वासाने प्रतिसाद देत संपूर्ण देशाला एकजूट होण्याचा संदेश दिला.












Click it and Unblock the Notifications