Suryakumar Yadav : कॅप्टनचा धमाका! वादळी फिफ्टीनंतर सूर्यकुमार थेट 'या' व्यक्तीच्या पडला पाया;Video
Suryakumar Yadav comeback : आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्मशी झुंज देणारा भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अखेर आपल्या जुन्या लयीत (Suryakumar Yadav comeback) परतला आहे.
रायपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्याची बॅट अक्षरशः तळपली. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकत मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र, विजयापेक्षाही सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे सामना संपल्यानंतर मैदानात घडलेल्या एका भावूक प्रसंगाची!

१४ महिन्यांचा वनवास संपला, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
सूर्यकुमार यादव हा टी-20 फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता.
तब्बल १४ महिने आणि २३ डावांनंतर सूर्याने अर्धशतकी खेळी साकारली. यापूर्वी त्याने १२ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध ७५ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर कालच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसं काढत टीकाकारांची तोंडं बंद केली. भारताने १६ व्या षटकातच २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले, यात कर्णधार सूर्याचा वाटा मोलाचा होता.
सामना संपताच सूर्याने कोणाचे पाय धरले?
भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर एक अजब दृश्य पाहायला मिळाले. विजयाचा जल्लोष करण्याऐवजी सूर्यकुमार यादव थेट टीम इंडियाचे थ्रोडाउन स्पेशालिस्ट राघवेंद्र द्विवेदी (रघू) यांच्याकडे गेला आणि सर्वांसमोर त्यांच्या पाया पडला. कर्णधाराने एका साध्या कर्मचाऱ्याच्या पायावर लोटांगण घातलेले पाहून मैदानावरील प्रेक्षक आणि सोशल मीडियावरील चाहते थक्क झाले.
का पडला पाया?
सूर्याच्या या यशामागे रघू भैयांची अतोनात मेहनत आहे. खराब फॉर्ममध्ये असताना रघू यांनीच नेट्समध्ये सूर्याकडून कसून सराव करून घेतला होता. १५० किमी/तास वेगाने चेंडू फेकून फलंदाजांना सज्ज करणाऱ्या रघू यांच्या मार्गदर्शनामुळेच सूर्याचा आत्मविश्वास परतला. आपल्या यशाचे श्रेय पडद्यामागच्या या नायकाला देण्यासाठी सूर्याने ही नम्र कृती केली.
कोण आहे हा 'रघू'?
राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघू हे भारतीय क्रिकेट वर्तुळातील एक अतिशय आदराचे नाव आहे. त्यांच्या संघर्षाची गाथा थक्क करणारी आहे:
मूळ गाव: कर्नाटकच्या कुमटा गावातील रघू यांना लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते.
घर सोडले : वडिलांचा विरोध पत्करून ते केवळ २१ रुपये खिशात घेऊन घरून बाहेर पडले होते.
दुर्दैवी अपघात : क्रिकेटर होण्याचे स्वप्न होते, पण हात फ्रॅक्चर झाल्यामुळे ते अधुरे राहिले.
जिद्द : हार न मानता त्यांनी हुबळीत खेळाडूंना चेंडू टाकण्याचे काम सुरू केले. आज ते २०११ पासून भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांसारखे दिग्गज खेळाडू देखील रघू यांच्या थ्रोडाउन सरावाचे कौतुक करतात. फलंदाजांना वेगाचा सराव करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
सूर्याच्या नम्रतेने जिंकली चाहत्यांची मने
सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या या कृतीचे जोरदार कौतुक होत आहे. "यश कितीही मोठे मिळाले तरी आपले पाय जमिनीवर असावेत," याचे उत्तम उदाहरण सूर्याने घालून दिले आहे. वर्ल्डकपच्या तोंडावर कर्णधाराचा फॉर्म परतणे आणि संघातील वातावरण इतके सकारात्मक असणे, ही भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच शुभसंकेत आहेत.












Click it and Unblock the Notifications