रोहित शर्माच्या खराब कामगिरीचं कारण काय ? माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितल कारण
प्रीतेश सूर्यवंशी
मुंबई : रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का मानला जातो. रोहित शर्मा फॉर्ममध्ये असला की त्याच्याएवढा घातक फलंदाज जगात दुसरा कोणी नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. टी-20 असो की एकदिवसीय सामना. रोहित शर्माने नेहमीच आपला रोखठोक अंदाज दाखवून दिला आहे. मात्र आयपीएलच्या 2025 च्या सीजनमध्ये रोहित शर्मा अद्याप खास कामगिरी करू शकलेला नाही.

रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्याने मुंबईची फलंदाजी कमकुवत झाली आहे. मात्र रोहित शर्मा फॉर्ममध्ये का नाही? याचं विश्लेषण माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी यांनी वनइंडिया मराठीसोबत केलेल्या संवादामध्ये केलं आहे.
5 पैकी 4 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. 5 पैकी केवळ एकाच सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला आहे. मात्र उर्वरित 4 सामन्यांमध्ये मुंबईला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. मुंबईसाठी गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीमध्ये रोहित शर्मा हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. मात्र मुंबईचा हाच हुकूमी एक्का अद्याप फॉर्ममध्ये आलेला नाही. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये केवळ 38 धावा बनवल्या आहेत. रोहित शर्मा हवा तसा खेळत नसल्याने मुंबईच्या इतर फलंदाजांवरील दबाव सुद्धा वाढला आहे. यामुळे मुंबईला 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
रोहित शर्माचं काय चुकतयं?
माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी यांनी रोहित शर्माच्या फॉर्मचं विश्लेषण केलं आहे. वनइंडिया मराठीसोबत संवाद साधताना सुलक्षण कुलकर्णी म्हणाले की, रोहित शर्मा आता 37 वर्षांचा झाला आहे. रोहित शर्मा तरुण होता तेव्हा त्याचं असलेलं फूटवर्क आणि आत्ताचं फूटवर्क यात खूप फरक आहे. रोहित शर्माच्या खेळात आता फारसं फूटवर्क दिसून येत नाही. तो जागेवरूनच चेंडूच्या वेगाचा फायदा घेताना दिसून येतो. तसचं आत येणारे म्हणजे इनस्विंग चेंडू रोहित शर्मासाठी अडचणीचे ठरत आहेत. आता येणारा चेंडू असला की रोहित शर्मा गडबडल्याचं दिसून आलं आहे. रोहित शर्माची हीच कमकुवत बाजू गोलंदाजांनी सुद्धा ओळखली आहे. याच इनस्विंग चेंडूंमुळे रोहित शर्मा हवी तशी कामगिरी करू शकत नसल्याचे सुलक्षण कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
रिटायर्ड आऊट करणे म्हणजे तिलक वर्माचा अपमान
दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स दरम्यान झालेल्या एका घटनेवरही सुलक्षण कुलकर्णी यांनी भाष्य केलं. या सामन्या दरम्यान तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्यात आलं होत. मुंबईच्या या निर्णयावर कुलकर्णी यांनी परखड भाष्य केलं. एखाद्या खेळाडूला अशा पद्धतीनं मैदानातून बोलावून घेणं म्हणजे त्याचा अपमान असल्याच कुलकर्णी म्हणाले. तसेच तिलक वर्माला बाहेर पाठवून मिचेल सँटनरला आत बोलावण्याचा निर्णय समजण्या पलीकडचा असल्याचंही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications