'देवा पाऊस पडू दे' भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रार्थना, पाकिस्तान घाबरलाय
India vs Pakistan T20 World Cup 2026 : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा आणि त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना! टी-२० विश्वचषक २०२६ मधील हा बहुप्रतिक्षित सामना आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, खेळाडूंच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडण्यापूर्वीच निसर्गाच्या पावसाने खेळाचा बेरंग करण्याची चिन्हे दिसत आहेत. या अनिश्चिततेच्या वातावरणात एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या विधानाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.

"अल्लाह पाऊस पाडो!" - बासित अलींची अजब मागणी
जगभरातील चाहते हा सामना पूर्ण व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत असताना, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी मात्र उलटीच भूमिका घेतली आहे. 'ए स्पोर्ट्स'वरील एका चर्चेदरम्यान त्यांनी थेट विधान केले की, "माझी प्रार्थना आहे की अल्लाह तआला पाऊस पाडो." जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला भारत-पाकिस्तानचा ऐतिहासिक सामना पाहायचा नाही का? तेव्हा त्यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत म्हटले, "मला फक्त पाऊस हवा आहे."
बासित अलींच्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात दोनच प्रश्न विचारले जात आहेत. पाकिस्तान भारतीय संघाला सामोरे जाण्यास घाबरत आहे का? की ही केवळ गुणांच्या गणिताची एक रणनीती आहे?
पावसाच्या प्रार्थनेमागील 'पॉइंट्स टेबल'चे गणित
क्रीडा तज्ञांच्या मते, बासित अली यांचे हे विधान निव्वळ योगायोग नसून त्यामागे एक ठोस रणनीती असू शकते. सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास परिस्थिती स्पष्ट होते.
सध्याची स्थिती
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले असून दोघांकडे प्रत्येकी ४ गुण आहेत.
पाऊस पडल्यास काय होईल?
जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल.
फायदा काय?
प्रत्येकी 5 गुण मिळाल्यास दोन्ही संघ अधिकृतपणे 'सुपर 8' फेरीसाठी पात्र ठरतील. कारण गटातील इतर संघ (यूएसए, नेदरलँड्स आणि नामिबिया) जास्तीत जास्त 4 गुणांपर्यंतच मजल मारू शकतात. थोडक्यात सांगायचे तर, पराभवाचा धोका पत्करून गुण गमावण्यापेक्षा, पावसाच्या कृपेने 1 गुण मिळवून सुरक्षितपणे पुढच्या फेरीत जाणे पाकिस्तानला अधिक सोयीचे वाटत असावे.
आयसीसीचे नियम आणि पावसाचा 'खलनायक'
टी-२० सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळणे अनिवार्य आहे. कोलंबोमध्ये आज पावसाची शक्यता तब्बल 93% वर्तवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, गट टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही 'राखीव दिवस' ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर किमान 5 षटकांचा खेळही होऊ शकला नाही, तर सामना रद्द घोषित केला जाईल.
हवामान अपडेट : चाहत्यांसाठी चिंतेची बात
अॅक्युवेदरच्या अंदाजानुसार, दुपारी कोलंबोमध्ये जोरदार वादळाची शक्यता आहे. मात्र, चाहत्यांसाठी एक आशेचा किरण म्हणजे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत (सामन्याच्या वेळेस) पावसाची शक्यता 25% ते 49% पर्यंत कमी होऊ शकते.
आर. प्रेमदासा स्टेडियमची ड्रेनेज यंत्रणा उत्तम असली, तरी मुसळधार पाऊस झाल्यास मैदान सुकवण्यासाठी मोठा वेळ जाऊ शकतो, ज्यामुळे षटकांची कपात निश्चित मानली जात आहे.
पावसाचा फायदा कोणाला?
सामना रद्द झाला तरी भारत आपल्या सरस नेट रन रेट (NRR) मुळे गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम राहील. पाकिस्तानसाठी मात्र हा 1 गुण म्हणजे 'सुपर 8' चे निश्चित तिकीट असेल. आता पाहायचे हे आहे की, बासित अलींची 'पावसाची प्रार्थना' ऐकली जाते की चाहत्यांची 'क्रिकेटची इच्छा' पूर्ण होते.












Click it and Unblock the Notifications