पाच शतकांचं सोनेरी प्रदर्शन व्यर्थ; इंग्लंडकडून भारताचा लीड्स कसोटीत 5 गड्यांनी पराभव
भारतीय संघाच्या दमदार फलंदाजीला इंग्लंडच्या संयमी आणि योजनाबद्ध फलंदाजीने मोठा धक्का दिला. अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत इंग्लंडने भारतावर 5 गड्यांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 371 धावांचे लक्ष्य दिल्यानंतरही इंग्लंडच्या फलंदाजांनी शिस्तबद्ध खेळी करत सामना आपल्या बाजूने वळवला.

फलंदाजीचा धडाका, पण गोलंदाजांची निराशा
भारताच्या दोन्ही डावांमध्ये एकूण पाच शतके झळकली. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत (दोन्ही डावात) आणि के.एल. राहुल यांनी शतकी खेळी करत मजबूत धावसंख्या उभारली. पण गोलंदाज मात्र अपेक्षित तडका लावू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 5 बळी घेतले, पण दुसऱ्या डावात त्याला यश हाती लागले नाही. प्रसिद्ध कृष्णा, सिराज, जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांची कामगिरी अपुरी ठरली.
पहिला डाव भारताची फलंदाजीची तुफान लाट
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारताने 471 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार शुभमन गिलने 147 धावा, यशस्वी जैस्वालने 101 आणि ऋषभ पंतने 134 धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच झटपटवलं. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी चार बळी घेत काहीसा प्रतिकार केला.
इंग्लंडचा पहिला डाव पोपचे शतक, बुमराहचा पंच
इंग्लंडने पहिल्या डावात 465 धावा करत भारतीय आघाडीला जवळजवळ जवळ आणलं. ओली पोपने 106 धावा केल्या, तर हॅरी ब्रूक फक्त एका धावेच्या फरकाने शतक गमावला. बुमराहने 5 विकेट्स घेत आपल्या नावाला न्याय दिला, तर प्रसिद्ध कृष्णाला 3 आणि सिराजला 2 बळी मिळाले.
दुसरा डाव पंत-राहुलची शतकी खेळी, पण शेवटी कोसळला डाव
दुसऱ्या डावात पंतने 118 धावा आणि राहुलने 137 धावा करत भारतीय संघाला 364 पर्यंत नेलं. मात्र शेवटच्या सहा फलंदाजांची धावसंख्या फक्त 31 इतकी होती. त्यामुळे जिथं भारत 400 पार करू शकला असता, तिथे संघाला 364 वरच समाधान मानावं लागलं. इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं. ब्रायडन कार्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 3 बळी घेत भारताचा अर्धा डाव उडवून लावला.
इंग्लंडचा दुसरा डाव डकेटचा दणका, रूटने दिला पूर्णविराम
371 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने अफलातून सुरुवात केली. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं. डकेटने 149, क्रॉलीने 65 आणि रूटने संयमी खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. बुमराहला दुसऱ्या डावात एकही विकेट मिळाली नाही, ज्यामुळे भारताची मुख्य आघाडी संपुष्टात आली.
संपूर्ण मालिकेवर परिणाम करणारा पराभव?
या पराभवामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. भारताला फलंदाजांच्या जोरदार कामगिरीनंतरही पराभव पत्करावा लागल्याने संघ व्यवस्थापनासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पुढील सामन्यांत गोलंदाजीचा दर्जा उंचावणे अत्यावश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications