Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामना होणार का?, कसं आहे टॉप-2 टीमचं समीकरण!
Asia Cup 2025 : यावर्षीचा आशिया कप सुरू होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच चर्चा होती की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार का?, आता सुपर-4 फेरी सुरू झाली आहे आणि या प्रश्नाचे उत्तर अजूनही निश्चित नाही.
लीग स्टेजमध्ये काल भारतीय संघाने पाकिस्तान संघाच्या चारीमुंड्या चीत केल्या अन् आता सुपर-४ मध्ये परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. कारण, भारत-पाकिस्तान फायनल होणार की नाही, हे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण गणित...!

सुपर-4 मध्ये पाकची स्थिती बिकट
सुपर-४ मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ आहेत. आतापर्यंत प्रत्येक संघाने एक-एक सामना खेळला आहे.
भारत आणि बांगलादेश यांनी आपापले पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर, तर बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
पाकिस्तानला आता आपले पुढील दोन सामने श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहेत. जर पाकिस्तानने या दोन्ही सामन्यांपैकी एकाही सामन्यात पराभव स्वीकारला, तर त्यांचे फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास भंगू शकते.
नेट रन रेट ठरणार महत्त्वाचा
समजा, पाकिस्तानने एक सामना जिंकला आणि एक गमावला, तर त्यांचे दोन गुण होतील. जर त्याच वेळी श्रीलंका आणि बांगलादेशनेही प्रत्येकी एक-एक सामना जिंकला, तर या तिन्ही संघांचे गुण समान होतील.
अशा परिस्थितीत, नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. जर पाकिस्तानचा नेट रन रेट कमी असेल, तर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल आणि भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहील.
सध्या तरी पाकिस्तानचा मार्ग खूप कठीण दिसत आहे. भारताने आपले पुढील सामने जिंकले, तर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होईल.
त्यामुळे, आता सर्व लक्ष पुढील सामन्यांवर आहे, जे पाकिस्तानचे भवितव्य ठरवतील. क्रिकेटमधील अनिश्चितता पाहता, पुढील काही दिवसांतच अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications