Asia Cup 2025: भारत-पाकमध्ये वादाची ठिणगी: हस्तांदोलन अन् त्यामागील राजकारण, जाणून घ्या सर्व काही
Asia Cup 2025 : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने क्रिकेटच्या मैदानाबाहेरील तणाव पुन्हा एकदा समोर आणला आहे. भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केल्यानंतर, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. हा निर्णय काही अचानक घेण्यात आलेला नव्हता. त्यामागे, भारतीय संघ, बीसीसीआय आणि केंद्र सरकार यांच्यात एकमत झालेले असल्याची माहिती समोर आली आहे. चला तर यामागील राजकारण जाणून घेऊया, असा निर्णय का घेण्यात आला आणि आगामी काळात त्याचे काय परिणाम होणार, याविषयी सर्व काही जाणून घेऊया...!

संपूर्ण स्पर्धेत हस्तांदोलन नाही
बीसीसीआय आणि भारत सरकारने जरी आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळायला परवानगी दिली असली, तरी मैदानावर दोन्ही संघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण नसावे असे ठरले आहे.
सूत्रांनुसार, भारतीय संघाने केवळ या एका सामन्यापुरता नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेतून ही गोष्ट स्पष्ट होते. त्यांनी म्हटले की, "काही गोष्टी क्रीडा भावनेच्या पलीकडच्या आहेत." हा विजय भारतीय सशस्त्र दलांना आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्याचा संदर्भ
हा निर्णय २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ भारतीयांना त्यांचा धर्म विचारून ठार मारले होते. या घटनेनंतर, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ आणि हवाई तळ उद्ध्वस्त केले होते.
ट्रॉफी स्वीकारण्यावरून नवा वाद
जर भारतीय संघ २८ सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत पोहोचला आणि विजेतेपद जिंकले, तर ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले आहे. नक्वी सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आहेत. यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु यामुळे आणखी एक मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानची तक्रार आणि माजी खेळाडूंची प्रतिक्रिया
भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार केली आहे. पीसीबीने भारतीय संघाने खिलाडूवृत्ती दाखवली नसल्याचा आरोप केला आहे.
तसेच, पीसीबीने पायक्रॉफ्ट यांच्यावर भारतीय संघाच्या दबावाखाली दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.
यामुळे, पीसीबीने पायक्रॉफ्ट यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे आणि तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालन संचालक उस्मान वहाला यांना निलंबितही केले आहे.
या वादात अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही उडी घेतली आहे. रशीद लतीफ यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये असे म्हटले, तर शोएब अख्तर यांनीही हा केवळ एक क्रिकेट सामना होता असे सांगत राजकारण टाळण्याचा सल्ला दिला.
नियम काय सांगतात?
क्रिकेटच्या नियमांनुसार, सामन्यानंतर हस्तांदोलन करणे अनिवार्य नाही. हा केवळ क्रीडा भावनेचा एक भाग मानला जातो, जो अनेक वर्षांपासून पाळला जात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, "ज्या देशासोबत संबंध इतके खराब आहेत, अशा देशासोबत हस्तांदोलन करण्यास भारतीय संघ बांधील नाही."
आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. अशा परिस्थितीतही भारताची भूमिका तीच राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या संपूर्ण प्रकरणावर एसीसी किंवा बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, ज्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरची ही कटुता आणखी किती काळ टिकेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications