असं काय घडलंय की धनंजय मुंडेंना त्यांचा बीड दौरा अचानक रद्द करावा लागला, असं कारण की माफीही मागितली
Dhananjay Munde : भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे आज सकाळी मुंबईतून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे जाणार होते. परंतु धनंजय मुंडेंचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द झाला याबाबत खुद्द धनंजय मुंडे यांनी कारण सांगितलं अन् त्यांनी काही लोकांची माफीही मागितली.
धनंजय मुंडे यांनी काय कारणं सांगितलं?
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा आज दौरा होता. हा दौरा अचानक रद्द करावा लागला. यााबाबत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे.

मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे.
मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 17, 2025
"दौरा रद्द करावा लागल्याबद्दल मी श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेरच्या रहिवाशांची हृदयपूर्वक क्षमा मागतो," असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास कसा आहे? कौटुंबिक वाद आणि वाल्मिक कराडशी संबंध घ्या जाणून
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे-धस वाद
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप नेते आणि आमदार सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला.
देशमुख हत्या प्रकरणासह बीड जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी घटनांवरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक घणाघाती आरोप केले. आमदार धस यांनी केलेले आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात आढळलेला निकटवर्तीयांचा सहभाग यामुळे मुंडे यांनी आपलं मंत्रिपद सोडावं लागलं.
एकत्र व्यासपिठावर नको म्हणून तर दौरा रद्द झाला नसेल ना?
देशमुख हत्येनंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षानंतर आज पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र धनंजय मुंडे यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने या चर्चेलाही पूर्णविराम देण्यात आला. परंतु, सुरेश धस यांच्यासोबत एकाच व्यासपिठावर यायला नको म्हणून तर मुंडे यांनी दौरा रद्द केला नाही ना, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications