मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाव फायनल? महायुतीचे तिन्ही नेते गेले दिल्लीला
Who is the new CM of Maharashtra- महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल, हे आता निश्चित झाले आहे. फक्त मुख्यमंत्री कोण, याबाबत उत्सुकता आहे. आज दुपारी महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला
आज नवी दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याबद्दल महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी, हे तिन्ही नेते दिल्लीला जाणार असल्याचे समजते. या कार्यक्रमानंतरच मुख्यमंत्री पदाची बैठक होईल. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकारची रुपरेषा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फडणवीस यांचे नाव फायनल?
राज्यात महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. त्यामुळे महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले. आता मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. महायुतीत भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे, अशा भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.
दोन फॉर्म्युल्याचीही राज्यात चर्चा?
मुख्यमंत्रिपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी अडीच- अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे.












Click it and Unblock the Notifications