कोण आहे प्रफुल्ल लोढा? हनी ट्रॅप आणि अल्पवयीन अत्याचार प्रकरणांमुळे चर्चेत
प्रफुल्ल लोढा, हे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'हनी ट्रॅप' आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी, साकीनाका आणि पिंपरी-चिंचवडमधील बावधन पोलीस ठाण्यांत त्याच्याविरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

राजकीय वलयातील अनधिकृत प्रभाव
कोणत्याही अधिकृत राजकीय पदावर नसतानाही, प्रफुल्ल लोढा याने गेल्या काही वर्षांत आपले एक मोठे स्वतंत्र नेटवर्क उभारले होते. राजकीय वर्तुळात आपला प्रभाव वाढवण्यासाठी तो ओळखी, सल्ला आणि वशिले यांचा वापर करत असत. अनेक वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये त्याची उपस्थिती लक्ष वेधून घेत असे. लोकांना नोकरी मिळवून देणे, आर्थिक मदत (फायनान्सिंग) करणे आणि गुंतवणुकीचा सल्ला देण्याच्या बहाण्याने तो उच्चभ्रू समाजात वावरत होता.
त्याच्या राजकीय जवळकीची नेहमीच चर्चा होत असे. मात्र, आता गंभीर गुन्ह्यांच्या या मालिकेमुळे त्याचे हे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. नेमका हा प्रफुल्ल लोढा कोण आहे, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि राजकीय कारकीर्द कशी आहे, हे जाणून घेऊया.
काँग्रेस समर्थक कुटुंबातील बंडखोर प्रफुल्ल लोढा
प्रफुल्ल लोढा याचा जन्म जामनेर तालुक्यातील पहूर या गावात रामचंद्र लोढा यांच्या घरी झाला. शालेय शिक्षणानंतर तो पुढील शिक्षणासाठी जामनेरमध्ये गेला. त्याचे वडील रामचंद्र लोढा, तसेच भाऊ सतीश आणि रायसिंग हे काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मुख्यतः ईश्वरलाल जैन यांचे विश्वासू म्हणून लोढा कुटुंबाची ओळख होती.
काँग्रेसची कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, प्रफुल्ल लोढा हा बंडखोर स्वभावाचा होता. वडील रामचंद्र यांचा ट्रान्सपोर्टचा पारंपरिक व्यवसाय होता, पण प्रफुल्लला काहीतरी वेगळे करायचे होते, असे तो मित्रांना सांगत असत. दुसरीकडे, त्याला दारूचे व्यसन जडले होते, ज्यामुळे कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
प्रफुल्ल लोढा याच्या मुलांचे व्यवसाय
प्रफुल्ल लोढा याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्याची मुले गॅस एजन्सी, बांधकाम आणि इलेक्ट्रिकल अशा विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. नुकतेच लोढा कुटुंबाने एक मोठे व्यापारी संकुलही विकत घेतले होते. हे सर्व व्यवसाय त्याची मुले सांभाळतात.
राजकीय प्रवास: गिरीश महाजन ते विविध पक्ष
प्रफुल्ल लोढा याचा राजकीय प्रवास १९९५ मध्ये सुरू झाला, जेव्हा गिरीश महाजन जामनेरमधून पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीत उतरले. याच काळात प्रफुल्ल लोढा महाजन यांच्या संपर्कात आला आणि हळूहळू त्याने महाजन यांचा विश्वास संपादन केला. आमदार झाल्यावर गिरीश महाजन यांनी 'आरोग्य दूत' हा उपक्रम राबवला, ज्यात जळगाव भागातील रुग्णांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात येत असे. या उपक्रमात प्रफुल्ल लोढा सक्रिय होता असे म्हटले जाते.
गिरीश महाजन यांच्याशी वाद आणि खळबळजनक आरोप
लोढा आणि महाजन यांच्यातील नेमका वाद काय होता, हे कोणालाही निश्चित माहिती नाही. परंतु महाजन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर लोढाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०२०-२१ मध्ये प्रफुल्ल लोढा याने पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
"गिरीश महाजन यांनी मला सल्ले देऊ नयेत, मी जर एक बटण दाबले तर देशभरात खळबळ माजेल, पण यात ५-२५ निरपराध लोकांचे बळी जातील म्हणून मी शांत आहे," असा दावा लोढा याने त्यावेळी केला होता. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात एका सीडीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील प्रफुल्ल लोढाचा २०२०-२१ मधील व्हिडिओ पोस्ट करत महाजनांवर निशाणा साधला होता.
प्रफुल्ल लोढा याचा राजकीय प्रवास भाजपपासून सुरू झाला, त्यानंतर त्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ च्या निवडणुकीत त्याला वंचित बहुजन आघाडीकडून तिकीटही जाहीर झाले होते, मात्र ऐनवेळी त्याने माघार घेतली होती.












Click it and Unblock the Notifications