Weather Updates :उत्तरेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारेगार! आली थंडीची लाट; पारा घसरला
Weather Updates : उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्राला गारेगार केले असून सध्या राज्यात थंडीची लाट आली आहे. तर विदर्भातही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गत काही दिवसांपासून नाशिक, जळगाव आणि अकोल्याचा पारा झपाट्याने खाली येत असून महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे.
अकोल्यात किमान तापमान ९.६ अंश
रविवारी अकोल्यात किमान तापमान ९.६ अंश नोंदविले गेले. आज सोमवार १६ डिसेंबर रोजी सकाळी ९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. हे या मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान आहे. गेल्या आठवडाभरापासून किमान तापमान घसरण्याचे सत्र सुरू झाले आहे.

मंगळवारी अकोला शहराचे किमान तापमान ११.८ अंश नोंदविले गेले होते. तेव्हापासून तापमानात घट होत आहे. रविवारी त्यात मोठी घसरण झाली. शनिवारी १०.६ अंशावर असलेला अकोल्याचा पारा २४ तासात १ अंशाने घसरला असून, तो सरासरीपेक्षा ४.१ अंशाने कमी आहे. कमाल तापमानात शनिवारच्या तुलनेत १.२ अंशांची वाढ होऊन ३१.८ नोंदविले गेले.
आठवड्यापासून विदर्भाचा पारा घसरला
विदर्भात दिवसभर थंड वारे वाहात असल्याने विदर्भवासीयांना गारठ्याचा अनुभव येत आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासात १६ डिसेंबरपर्यंत अकोल्यासह विदर्भात थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांपासून दिवसाच्या तापमानातही मोठी घट झाली आहे. दुसरीकडे थंड वारे वाहात असल्याने भर दिवसाही उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक सायंकाळी सात वाजेनंतर घरात परतण्यास पसंती देत आहेत. परिणामी बाजारपेठेतील गर्दी लवकरच ओसरत असल्याचे चित्र आहे.
नाशिक
नाशिकमध्ये गारठा कायम असून निफाडमध्ये सर्वात जास्त गारठा जाणवत आहे. नाशिकसह जळगावमध्येही असेच तापमान असून तूर्त नाशिकचा चांगलाच पारा घसरला आहे. नाशिक मध्ये ९.४ तर निफाड मध्ये ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
परभणी
आज ही थंडी कायम , काल पेक्षा आज तापमान कमी
परभणी जिल्ह्यात आज ही थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक कमी तापमान 4.1 डिग्री सेल्सिअस राहीला आहे, या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने नोंदवली आहे.
उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरे कडून येणार थंड वारे तसेच आपल्या भागात असलेले कोरडे वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचे हवामान विभाग प्रमुख डॉ कैलास डाखोरे यांनी एका पत्रका व्दारे कळविले आहे. दरम्यान थंडी पासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करत असून नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. यासह महाराष्ट्रात असेच थंड तापमान आहे.












Click it and Unblock the Notifications