Wardha News काय सांगता! माजी खासदाराला चक्क राममंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला, हे आलं कारण समोर
Wardha News : रामनवमीनिमित्त काल 6 एप्रिलला विविध कार्यक्रम आणि रामलल्लाच्या दर्शनासाठी अनेकजणांनी राममंदीर गाठून देवाचे दर्शनही घेतले पण एक वाईट अनुभव कुणा साध्यासुध्या व्यक्तीला नाही तर चक्क एका माजी खासदाराला आला. त्यांना चक्क राम मंदीराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे.
माजी खासदार रामदास तडस यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या घटनेने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर जाणून घेऊया नेमका काय प्रकार घडला..

नेमका काय प्रकार घडला?
रविवारी म्हणजेच 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीनिमित्त काल राम भक्त असलेले माजी खासदार रामदास तडस हे वर्ध्यातील देवळी येथील राममंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारला. यावरुन तडस आणि पुजारी यांच्यात वादही झाला.
काय म्हणाले पुजारी?
मंदिरातील गाभाऱ्यात तडस यांना प्रवेश नाकारल्याचे वृत्त सकाळने दिले आहे. त्यानुसार, तडस यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचे होते, मात्र गाभाऱ्यात पुजा सुरु होती. रामदास तडस जेव्हा गाभाऱ्यात तेव्हा पुजाऱ्यांनी पुजा थांबवली आणि तुम्ही लांबच राहा, मुर्तीची पुजा करता येणार नाही असे तडस यांना पुजाऱ्यांनी सांगितले.
रामदास तडस यांना पुजाऱ्यांनी का अडवलं...
रामाची पुजा का करता येणार नाही असे रामदास तडस यांनी पुजाऱ्यांना विचारले तेव्हा रामदास तडस यांनी सोवळं घातलं नसल्याचे पुजाऱ्याचे म्हणणे होते. त्यामुळे तडस यांनी समजदारपणा घेत बाहेरुन दर्शन घेतले.
हा वाईट प्रकार - तडस यांची प्रतिक्रीया
दरम्यान या प्रकारामुळे तडस हे संतप्त झाले आणि त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. देवळीच्या मंदिरातील पुजारी हे पिढीजात आहेत. मी चाळीस वर्षांपासून रामनवमीला येथे दर्शनाला जातो. नेहमी गाभाऱ्यात जाऊन प्रभु रामाची पुजा करतो. आमची देवावर श्रद्धा आहे. पण पुजाऱ्यांनी सोवळ्याचा काय प्रकार लावला असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला. तसेच संबंधित पुजारी मंदिराचा ट्रस्टी आहे ते फक्त रामनवमीलाच मंदिरात येतात एक दिवस येऊन नियम सांगणे योग्य नसल्याची तडस यांनी आपली भावना व्यक्त केली.
कोण आहेत रामदास तडस?
रामदास चंद्रभान तडस हे वर्धा जिल्ह्यातील एक मोठे राजकीय नाव आहे. भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या वर्धा मतदारसंघातून निवडून गेले. तर १६ व्या आणि १७ व्या लोकसभेचे सदस्यही होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून ते यापुर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे.












Click it and Unblock the Notifications