आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना! चड्डा बिल्डरच्या घशात 400 कोटी - विजय वडेट्टीवारांचा आरोप
मुंबई : गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली राज्य सरकारने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का, असा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
400 कोटींची खिरापत का दिली जाते
मे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीला बिनव्याजी स्वरूपात 400 कोटींचे कर्ज देण्याची मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. 2021 मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला. मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही असे असताना त्याला 400 कोटींची खिरापत का दिली जाते असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला. त्यानंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणतंय याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी प्रचितगड या आपल्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
लाडका कंत्राटदारनंतर आता
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 22, 2024
मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना!
अनुभव नसलेल्या चड्डा बिल्डरच्या घशात घातले 400 कोटी रुपये.
बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का नाही मिळाली ? बिल्डरसाठी पैसे आहेत पण बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत.
गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा…
विद्यार्थ्यांना 2 वर्षापासून शिष्यवृत्ती नाही
विजय वडेट्टीवार म्हणाले, बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षापासून शिष्यवृत्ती नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तरी देखील सरकारला जाग येत नाही. महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या विद्यार्थ्यांची देखील अशीच परिस्थिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.
शेतकऱ्यांना मदत करा
विजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भात प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर परिसरात अतिवृष्टीमुळे धोक्यात आलेल्यांना सुरक्षित स्थळी लोकांना हलवून त्यांना आवश्यत सुविधा देणं महत्वाचं आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या निवारा, जेवण, आरोग्याची व्यवस्था करावी. पशुधन देखील अडचणीत सापडले असून पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आल्यानंतर त्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर लाडका भाऊ योजना का आणली जात नाही म्हणूनही मुख्यमंत्री शिंदे सरकार टीकेचे धनी झाले होते. त्यानंतर मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनीही ते आता लाडका मेव्हुणा, लाडकी मेव्हुणी योजनाही काढतील अशी टीका केली होती. तसेच मुलींचे मोफत शिक्षण करावे अशी मागणीही केली हेती. या धर्तीवर आता विजय वडेट्टीवार यांनीही सरकारचे कोन टोचले असून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत












Click it and Unblock the Notifications