भुजबळ-मुंडे बाहेर एक बोलतात अन् आत वेगळे! ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर 'या' नेत्याने डागली तोफ
Vijay Vadettewar alleges Chhagan Bhujbal Pankaja Munde : राज्य सरकारने काढलेल्या एका शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारचा हा निर्णय ओबीसी आरक्षणाला धक्का लावत आहे आणि यामुळे मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पुन्हा पेटला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ओबीसी नेत्यांवर दुटप्पीपणाचा आरोप
वडेट्टीवार यांनी ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'जे नेते बाहेर एक भूमिका मांडतात, तीच भूमिका त्यांनी सरकारी बैठकांमध्ये मांडावी.' जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्यांना पाडण्याचे आवाहन भुजबळ करत असतील, तर ज्या सरकारने ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा निर्णय काढला आहे, ते सरकारच पाडले पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे, असा टोला त्यांनी लगावला.
सरकारला चर्चेचे आव्हान
वडेट्टीवार यांनी सरकारला ओबीसी प्रश्नावर तातडीने बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी सर्व नेत्यांना चर्चेसाठी बोलवावे. आम्ही पुरावे देऊ की ओबीसी समाजाचे नेमके काय नुकसान होत आहे,' असे त्यांनी ठामपणे सांगितले. या सरकारने विकास थांबवून केवळ जातीपातीचे राजकारण सुरू केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे, अशी कठोर टीकाही त्यांनी केली.
पडळकरांवरही जोरदार टीका
याच पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला अश्लाघ्य भाषा वापरून आई-वडिलांना शिव्या देणे म्हटले आहे. 'राजकीय नेत्यांवर टीका करा, पण त्यांच्या आई-वडिलांवर बोलणे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडत आहे. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : ..तर खुर्ची खाली करा! तुमची मंत्रीपदं दुसऱ्यांना देईल - अजित पवारांचा मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा!












Click it and Unblock the Notifications