..तर खुर्ची खाली करा! तुमची मंत्रीपदं दुसऱ्यांना देईल - अजित पवारांचा मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा!
Ajit Pawar warns NCP ministers : "पक्षापेक्षा मंत्रिमहोदयांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करुया आणि दुसऱ्यांना देऊया, म्हणजे कळेल. ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले, त्यांना तिथे जावेच लागेल. राष्ट्रीय सणांपुरते जाऊन चालणार नाही, त्या दिवशी जावेच लागेल त्याशिवायही ज्यांना इतर जिल्हे आणि तालुके दिले जातील तिथे आपल्या पक्षाचे आमदार ते प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊ आपल्याला लोकांमध्ये फिरावे लागेल, छोट्या चुका टाळा नाहीतर खुर्ची खाली करा," असा निर्वाणीचा इशारा राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे पक्षाचे चिंतन शिबिर होत आहे. या शिबिराच्या उद्घाटन भाषणात अजित दादांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या.
..तर मंत्रीपद मोकळं करा, दुसऱ्यांना देऊ
अजित पवार म्हणाले, मंत्री महोदयांना हेच सांगायचे की, माझ्यासहीत प्रत्येकाचे नियोजन ठरायला हवे. आठवड्यातील कोणते तीन दिवस मुंबईत, बाकीच्या चार दिवसांतील एक दिवस त्यांच्या स्वःतच्या मतदारसंघासाठी व बाकीचे दिवस पक्षासाठी द्यायचे आहेत. मी आज निर्वाणीचे सांगतो की, पक्षापेक्षा मंत्रिमहोदयांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करुया आणि दुसऱ्यांना देऊया, म्हणजे कळेल की, आता नुसते शिबीर घेऊन चालणार नाही, शिबिरातील निर्णयाची अंमलबजावणीसाठी संघटना संघटनेचे काम करेलच.
अजित दादांनी टोचले मंत्र्यांचे कान
अजित पवार म्हणाले, त्यावेळचे राजकारण आणि आजच्या राजकारणात जमीन आसमानचा फरक आहे,एखाद्या व्हिडिओतील एखादाच वाक्य दाखवून मागचे पुढचे बाजूला करुन ट्रोल केले जाते. कामे न करता काही प्रसिद्धी करतात, काही कामे करुनही त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले, त्यांना तिथे जावेच लागेल. फक्त १ मे, १५ ऑगस्ट २६ जानेवारीलाच जाणे नाही... त्या दिवशी जावेच लागेल त्याशिवायही त्यांना इतर जिल्हे आणि तालुके दिले जातील तिथे आपल्या पक्षाचे आमदार ते प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊ आपल्याला लोकांमध्ये फिरावे लागेल. काही मंत्री जिल्हाध्यक्षांनाही विचारत नाही, बोलत नाही, त्यांना सोबत घ्यावे लागेल, छोट्या-मोठ्या चुका दुरुस्त करा नाहीतर खर्ची खाली करावी लागेल.
लोकांना आज-उद्या करु नका, त्यांची कामे करा
अजित पवार म्हणाले, आपण लोकांचे ऐकायला हवे, ठोस अभिप्रायही ऐकला पाहीजे. बघु करु आज या, उद्या या असे लोकांना करु नका, त्यांची मदत करा, संवादाच्या माध्यमातूनच लोकांमध्ये आपण विश्वास तयार करु शकतो. सरकार आणि पक्ष मिळून आपण सर्व मिळून यांच्यातील घट्ट समन्वय आपण तयार करुया.
लोकांना सतत भेटावे लागते..
अजित पवार म्हणाले, लोकांना सतत भेटावे लागते, ते सातत्यासाठी महत्वाचे आहे तरच सातत्य टिकते. इतिहास लिहिला जात नाही, तो अशा बैठकींत घडतो. पुढील पिढ्या मागे वळुन पाहतील, त्यामुळे आपण एकत्रित चर्चा करुया.
आराखडा तयार करणार, जबाबदाऱ्या निश्चित करणार
अजित पवार म्हणाले, चर्चेनंतर जबाबदाऱ्या निश्चित करायच्या, त्याची कालमर्यादा ठरवायची आहे. सर्व मिळून तयार कराल तो आराखडा आपण दिवसाअखेरपर्यंत नागपूर डिक्लरेशन म्हणून एनसीपी प्रसिद्ध करेल.
अजित पवार म्हणाले, पक्षवाढीसाठी निष्ठेने कार्य कराल ही अपेक्षा आहे, निष्ठेने काम करुया. प्रामाणिकपणे आशावादी भाषेत सर्व जनता, सहकाऱ्यांशी संवाद साधूया.
.. तर पुढच्या वेळी दरवाजे बंद
अजित पवार म्हणाले, वेळेला महत्व द्या,वेळत या. खरंतर पुढच्या वेळी साडे नऊला कार्यक्रम असेल तर वेळ निघून गेल्यानंतर दरवाजा बंद करायचा, विमान कसे असते सहाला टेकऑफ मागे राहा किंवा पुढे राहा,एकदा कळू द्या कुणाला किती गांभिर्य आहे.. एकदिवस पक्ष तुम्हाला सांगतो वेळेत या तरीही काहींना त्रास होतो.


Click it and Unblock the Notifications
