त्यांची खालून वरपर्यंत फाटलीय, वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंच झंझावाती भाषण
Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बुधवारी पक्षाचा ५८ वा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात साजरा केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांचा यावेळी सत्कार झाला. त्याचबरोबर पराभूत आमदारांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले. हिंदुत्व, शहरी आतंकवाद, विधानसभा निवडणूका या विषयांवर ठाकरेंनी प्रकाश टाकला.

विजयाचे श्रेय शिवसैनिकांना
लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाबद्दल उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. ठाकरे म्हणाले, "तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलं. विजयाचं श्रेय मला दिलं. पण विजयाचे खरे मानकरी तुम्ही आहात. भाजपला निवडणुकीत चांगलाच तडाखा बसलाय. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरु केली.
ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, मातेसमान शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांसोबत पुन्हा जायचं? ते गैरसमज पसरवून अपयश झाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची वरपासनं खालपर्यंत फाटलीये असा जोरदार प्रहार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही पुढचे खासदार
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना उद्धव ठाकरेंनी यावेळी धीर दिला. ते म्हणाले, मी विजयी उमेदवारांचा सत्कार केला, पराभूत झालेल्या लढाऊ योद्ध्यांचाही सत्कार केला. कारण जर मध्यावधी निवडणूक झालीच तर तुम्ही पुढचे खासदार असाल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांना धीर दिला. तसेच हे सरकार चालेल असे मला वाटत नाही आणि चालू नये असेच माझे मत असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनेला देशभक्तांची मतं पडली
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतं पडल्याची टीका भाजपसह अनेक विरोधी पक्षांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, आम्हाला मुस्लिमांची मतं पडल्याचा आरोप केला जातोय. हो पडतीलच.सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला पडली आहेत. त्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सारेच आले असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं अशी टीका आमच्यावर केली जाते. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी देशभक्तांनी आम्हाला मतं दिली आहेत. आम्ही हिंदुत्व सोडलं नसून मोदी आणि शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे.
आज त्यांच्यासोबत असलेले चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल विचारत ठाकरे म्हणाले, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी सुद्धा जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला आश्वासनं दिल्याचा उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
...हा तुमचा नक्षलवाद नाही का?
आम्हाला मतदान करा असा प्रचार काही पत्रकारांनी केला म्हणून त्याला शहरी नक्षलवाद असं संबोधल्या गेलं. म्हणजे लोकशाही वाचवणं हा आतंकवाद आहे का? असेल तर मी सुद्धा आतंकवादी आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले, सुरळीत सुरु असेलेली सरकार पाडायची आणि नंतर त्यांना सोबत घेऊन मंत्रीपदं द्यायची, ही लोकशाहीची हत्या आहे. हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक प्रकार आहे. खरे नक्षलवादी तुम्ही असल्याचा जोरदार प्रहार यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.












Click it and Unblock the Notifications