हरियाणाच्या निकालानंतर 'सामना'तून काँग्रेसवर टिका; महाराष्ट्रातील नेत्यांना दिला 'हा' सल्ला
मुंबई : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी लागले. हरियाणात भाजपने धडाकेबाज विजय मिळवला. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र भाजपची पिछेहाट झाली. तेथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळालं. या संपूर्ण निकालावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून परखड भाष्य करण्यात आलं. महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही, असं म्हणत सामनातून काँग्रेसलाही आरसा दाखविण्यात आला. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावं, असा टोलाही ठाकरे गटाने मारला.
काय म्हटलं सामनाच्या अग्रलेखात ?
हरियाणात काँग्रेसने 'आप'सह अनेक पक्षांना दूर ठेवलं. या खेळात संपूर्ण राज्यच हातून गेले. हरियाणातील काँग्रेसची पीछेहाट 'इंडिया आघाडी'साठी बरी नाही. जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे, हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल, असा टोलाही अग्रलेखात लावला गेला आहे. हरियाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल हे भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसला. हरियाणात भाजपचे सरकार येईल, असे कुणीच म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असेच वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल.

मोदी-शहांना कश्मीरच्या जनतेने झिडकारले
जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बहुमत मिळवले. कश्मीरातील जनता मोदी-शहांनाच मतदान करेल, असे ढोल वाजवले जात होते. पाच वर्षांपूर्वी 370 कलम हटवून अमित शहांनी जणू क्रांतिकारक पाऊल टाकल्याचे जाहीर केले. कश्मीरातून 370 कलम हटवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार केल्याचा आव मोदी-शहा आणत होते, पण कश्मीरातील दहशतवाद त्यांना संपवता आला नाही. तरुणांना रोजगार देण्यात मोदी-शहा तोकडे पडले. मुख्य म्हणजे, कश्मिरी पंडितांची घरवापसी मोदी-शहा करू शकले नाहीत. 370 कलम काढणे हा फार्स ठरला व तेथील जनतेने भाजपचा पराभव केला. पंतप्रधान मोदी यांना कश्मीरच्या जनतेने झिडकारले.
भाजपची 'स्ट्रॅटेजी' बिनचूक ठरली
हरियाणातील भाजपचे संघटना आणि स्ट्रॅटजीचे सामनातून कौतुक करण्यात आले. काँग्रेसचे सूत्रधार आपणच व आपण ठरवू तेच उमेदवार अशी हुड्डा यांची भूमिका होती. पक्षातील कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा जाहीर अपमान हुड्डा तसेच त्यांच्या लोकांनी केला. कुस्तीपटू विनेश फोगट प्रकरणाची चीड हरियाणात स्पष्ट दिसत होती. पण विनेश फोगाट स्वतः जिंकली तरी या प्रकरणातील नाराजीचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही. काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल होते. राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावे लागते. भाजपचे संघटन मजबूत होते व 'स्ट्रटेजी' बिनचूक ठरली.
भाजपचा विजय संशयास्पद
बलात्काराच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी 'पॅरोल'वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही भाजपच्या विजयात 'वाटा' आहे. हा बाबा नेमका निवडणुकीच्या काही दिवस आधी 'पॅरोल'वर कसा सुटतो..? हा प्रश्न पडलाय. निकालाच्या एक दिवसापूर्वीच हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले होते की, "भाजपच जिंकेल. आम्हीच जिंकू याचा सर्व बंदोबस्त केला आहे.'' सैनी यांचे हे विधान रहस्यमय आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसने ठिकठिकाणी जिलेब्या-लाडू वाटायला सुरुवात केली; पण पुढच्या तासाभरात भाजपने आघाडी घेतली. निवडणूक आयोगानेही नंतर मतमोजणीची गती मंद केली. हे का घडले? काँग्रेसची सर्वत्र आघाडी दिसत असताना मतमोजणी आणि त्याविषयीचे 'अपडेटस्' यांची गती अचानक कमी का झाली? हरियाणातील भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद ठरला आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना दाखवला आरसा
मोदी-शहांनी हरियाणातील विजयाने हुरळून जाऊ नये. कारण जम्मू-कश्मीरात त्यांचा पराभव झाला. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ होतो. हरियाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. उद्या महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयी होईल. मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे, अशी टिकाही सामनातून करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications