उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली,राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं
मुंबई: लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप, टीका प्रतिटीकांचा फड चांगलाच रंगलाय.उबाठा विरुद्ध शिवसेना, उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध उबाठा अशी धुळवड रंगलेली असतानाच आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा आणखी एक अंक रंगात येतोय.

महायुतीला राज ठाकरे यांनी दिलेल्या "बिनशर्त" पाठींब्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
"बिनशर्त" नव्हे "बिनशर्ट पाठींबा" उद्धव
शिवसेना स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. "उद्धव ठाकरे नको, म्हणून काहीजणांनी "बिनशर्ट" पाठींबा होता, बिनशर्ट म्हणजे उघड पाठींबा", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली होती. उद्धव यांच्या या टोल्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली.
मनसेकडून देखील चोख प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच समाचार घेतला होता. "हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही" असे प्रत्युत्तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिले होते. सामान्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची सोशल मिडीयावर चांगलीच रेवडी उडवली होती.
"राज"पुत्र अमित ठाकरे मैदानात
उबाठा आणि मनसेत असे धुमशान सुरु असताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी त्यात उडी घेतलीय. "वरळीत मागच्या विधानसभेतच्या वेळेस राजसाहेबांनी जेंव्हा 'बिनशर्त' पाठींबा दिला होता, त्यामुळे ज्यांचा मुलगा आमदार म्हणून निवडून आला, त्यांनीच असले विनोद करावेत याचं आश्चर्य वाटतं... कोणी कोणासाठी काय केलं आहे हे विसरलं नाही पाहिजे. राहिला विधानसभा निवडणुकीचा प्रश्न.. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत शक्ति दाखवेल हे नक्की." असा इशारा अमित यांनी दिलाय.
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना अवघ्या ६ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यातच अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात आपला वावर वाढवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 9 रोजी एप्रिलला शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्याला संबोधित केलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी...परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे असं मी जाहीर करतो".












Click it and Unblock the Notifications