भैय्याजी जोशी चिल्लर माणूस; उद्धव ठाकरेंची राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्या जोशी यांच्या मुंबईबाबतच्या एका विधानावरुन सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांना आज पत्रकारांनी भैय्याजी जोशींबाबत विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी-अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकवू देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
बटेंगे तो कटेंगेचा अर्थ कळाला
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, त्यांच्या या वक्तव्यावरुन संघाचा हा छुपा अजेंडा आहे का? संघाचे दाखवण्याचे दात वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे का? हे पाहिले पाहिजे. ते 'बटेंगे ते कटेंग' म्हणतात. त्या 'बटेंगे ते कटेंग'चा अर्थ म्हणजे हिंदू-मुस्लीम नाही. मराठी -अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा द्वेष निर्माण करुन वाटणी करणार आहे. त्या अनाजीपंत यांनी मुंबईत जी अशी भाषा केली ती दक्षिण भारतात करुन दाखवावी. गुजरातमध्ये करुन दाखवावी, त्यानंतर महाराष्ट्रात सुखरुप येऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा
ठाकरे म्हणाले, भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे उद्धव ठाकरे यांनी केले. दोन्ही सभागृहात गोलमाल उत्तर दिली गेली आहे. ठाम उत्तर दिले नाही. मराठी भाषेचे महत्व भाजपला कळत नाही. त्यामुळे आज राज्य सरकारला तुमचे डोके ठिकाणावर आहे का? असे विचारावे लागत आहे.












Click it and Unblock the Notifications