ठाकरे गट-काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर; आता 'या' मोठ्या नेत्यावर दिली वाद मिटविण्याची जबाबदारी
मुंबई : महाविकास आघाडीत जागावाटपात सगळंच अलबेल असल्याचं दाखवलं जात असलं तरी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्र आहे. विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरुन या दोघांत वाद सुरु आहे. ठाकरे गट विदर्भातील 12 जागांवर अडून बसलाय तर, विदर्भात आमची ताकद आहे म्हणत काँग्रेसने या जागा सोडण्यास नकार दिलाय. हा वाद थेट काँग्रेसच्या श्रेष्ठीपर्यंत गेल्यानंतर तो चिघळला. दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर थेट पत्रकार परिषदांतून आरोप केलेत. आता हा गुंता सोडविण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत वाद सोडविण्याची जबाबदारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.

जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर
विदर्भातील जागांवरुन ठाकरे गट व काँग्रेसमध्ये कलगीतूरा सुरु आहे. नाना पटोले व संजय राऊत या दोन्ही मोठ्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केलेत. थेट पत्रकार परिषदेत या दोघांमधला कलह समोर आलाय. निवडणुकीला थोडा कालावधी राहिलेला असताना अजूनही जागावाटप होत नसल्याने मविआ बँकफूटवर आल्याचं चित्र आहे. त्यात हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील अशाही बातम्या येऊ लागल्यात. त्याने मविआला नुकसान होण्याची चिन्हे दिसू लागलीत. त्यामुळे काँग्रेसला हा मुद्दा लवकर निकाली काढायचा आहे. जागावाटपाचा मुद्दा मार्गी लावण्याची जबाबदारी आता काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे खुद्द थोरात यांनीच सांगितले आहे.
आज महाविकास आघाडीची पुन्हा बैठक
महाविकास आघाडीची सध्याची स्थिती म्हणजे तिढा म्हणता येणार नाही. आमच्यात चर्चा होईल. चर्चेतून मार्ग निघेल. 22 ऑक्टोबरच्या दुपारी तीन वाजता आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहोत, असेही स्वतः थोरात यांनी सांगितले. विशेष म्हणजे या वादानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ताठर भूमिका घेतलेली आहे. आम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, असे सूतोवाच ठाकरें गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. त्यानंतर आता हा गुंता सोडवण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा वाद मिटवण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.
गुरुवारच्या आत येणार उमेदवार यादी
काँग्रेस पक्षाची 21 ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या जागांसाठी काही नावं निश्चित करण्यात आली. याबाबत खुद्द बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली. आगामी दोन ते तीन दिवसांत उमेदवारांची नावं घोषित केली जातील, असे थोरात यांनी सांगितले. तसेच 22 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक होईल. त्या बैठकीत उर्वरित नावं निश्चित केली जातील, असेही थोरात यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications