'स्वराज्य'च्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला! आव्हाड म्हणाले- मी शांत बसणार नाही
मुंबईवरून ठाण्याकडे येत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. विशाळगड येथे झालेल्या कारवाईनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेनंतर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "माझ्या गाडीवर हल्ला केला तर मी शांत बसेल असे वाटत असेल तर असे अजिबात नाही मी यापुढे संभाजी महाराज यांच्या बद्दल आणखी त्वेषाने बोलणार अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

का झाला हल्ला?
जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपुर्वी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. विशाळगढावर झालेल्या हिंसाचाराला संभाजीराजे छत्रपती जबाबदार आहेत. ते छत्रपतींसारखे वागले नाहीत. ते शाहू महाराजांचे पुत्र आहेत का याबद्दल मला शंका आहे" असं आव्हाड यांनी म्हटलं होत.
आव्हाडांना धडा शिकवण्याचा दिला होता इशारा
दरम्यान या टीकेनंतर आम्ही आव्हाडांना धडा शिकवू असं संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर आव्हाड यांच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. आव्हाडांच्या टीकेला उत्तर म्हणून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतप्त
गाडीवर हल्ला झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. " संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली",असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक एकता या घराण्याने राखायला हवी होती. मी अजून त्वेशाने आणि तीव्रतेने बोलेन. स्वतः च्या वडिलांनी तुमचा निषेध केला. आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे असंही ते म्हणाले.
असा झाला हल्ला
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केला. सीएसटीएमकडून इस्ट्न फ्री वे वर हा हल्ला झाला.
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे.












Click it and Unblock the Notifications