दिशा सालियन प्रकरणावरुन सुषमा अंधारेंचा घाणाघात; चित्रा वाघ यांच्यासह सरकारवर साधला जोरदार निशाणा
शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलाच प्रहार केला. सध्या दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन विधिमंडळ सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे. विधानपरिषेदत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार चित्रा वाघ यांचे नाव घेऊन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही परब यांच्यावर पलटवार केला. याच प्रकरणावर आज सुषमा अंधारे यांनी जोरदार भाष्य केले.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे म्हणाल्या, काल एक बाई (चित्रा वाघ) विधान परिषदेत विचित्रपणे किंचाळत होती. अनेकजण म्हणाले की, त्या झोपडपट्टीतील भाषा वापरत होत्या. पण, झोपडपट्टीला देखील एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोकं आपले इमान विकत नाहीत. सभागृहात आणखी एक बाई होत्या, ज्यांना आम्हीच सदस्यत्व दिले. पण, जिकडे खावा तिकडे थवा असे त्यांचे काम आहे. या बायकांच्या आडून भाजप तीर मारत आहेत, म्हणून मी इथे उत्तर देत आहे. कधीकाळी या बाई पक्ष प्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे लोळत आल्या होत्या. संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली असे त्यांचे म्हणणे असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री कसे? असा सवालही त्यांनी विचारला.
नागपूर दंगलीवरही भाष्य
सुषमा अंधारे यांनी यावेळी नागपूर दंगलीतील अनेक आरोपी भाजपशी संबंधित असल्याचाही आरोप केला. नागपूर दंगलीतील काही आरोपी भाजपशी संबंधित आहे. त्याचे पुरावे आम्ही लवकरच जाहीर करू. नागपूर दंगल अंगाशी आली आहे, म्हणून भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले आहे. एखाद्याच्या दुःखाला आपले राजकारण करण्याचे नीच काम भाजपकडून होत आहे, असे त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांचा उल्लेख वाघबाई असा केला. त्या म्हणाल्या, वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. भाजप वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा कशा पद्धतीने करून घेत आहे ते दिसून येत आहे. वाघबाईंनी आकडा थोडा कमीच सांगितला. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे. राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. पण कालचा थयथयाट सभागृहाची प्रतिमा मलिन करणारा होता.
सरकारवर टिका
नागपूर दंगल फसल्यावर भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्या म्हणाल्या, औरंगजेब प्रकरण भाजपच्या अंगाशी आलंय. औरंगजेबाची कबर पाडायची तर विरोधक विरोध करतील, असे भाजपला वाटत होते. मात्र विरोधक या प्रकरणावर शांत राहिले. त्यानंतर काय करावे, म्हणून भाजपने दिशा सालियन प्रकरण उचलून धरलं. दिशाच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली, हे बरोबर आहे. त्यांच्या मुलीला न्याय मिळावा, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र भाजप या प्रकरणात आता राजकारण करत आहे, अशी टिका सुषमा अंधारे यांनी केली.












Click it and Unblock the Notifications