सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत, राहुल नार्वेकर मंत्रिपदाच्या वाटेवर?
महायुती सरकारमधील संभाव्य खांदेपालटाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'सामना' वृत्तपत्राने नुकताच एक सनसनाटी दावा केला आहे की, सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना पदावरून दूर केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारमधील सद्यस्थिती आणि अंतर्गत संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वादग्रस्त मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात असतानाच, 'सामना'च्या या दाव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या वृत्तानुसार, विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदी संधी दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी, गेल्या काही काळापासून सरकारविरोधी भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहुल नार्वेकर यांच्याकडून सूचक प्रतिक्रिया
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माध्यमांतील बातम्यांवर विश्वास नसून, पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. "पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यास मी तयार आहे. पक्षाची जी इच्छा असेल, तीच माझी इच्छा असेल," असे त्यांनी नमूद केले.
मंत्र्यांना डच्चू देण्याच्या चर्चेवर विचारले असता, त्यांनी थेट भाष्य करणे टाळले, मात्र "सगळे चांगले काम करत आहेत," असे म्हटले. तसेच, "पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल," असेही ते म्हणाले. मंत्रिपद मिळाल्यावर आनंद होईल का, या प्रश्नावर त्यांनी, "मला जी जबाबदारी मिळेल ती मी पार पाडणार आहे. विधानसभा अध्यक्ष असो किंवा मंत्री, शेवटी जनतेसाठीच काम करायचे आहे," अशी भूमिका मांडली.
नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. अधिवेशनामध्ये १५२ लक्षवेधी मांडण्यात आल्याचा उल्लेख करत, ते सध्याच्या पदावर समाधानी असल्याचे दिसले. "मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीने काम करत आहे. इतर जबाबदारी मिळाली तर ती सुद्धा पार पाडेन. अध्यक्ष म्हणून मी माझ्या कामावरती समाधानी आहे आणि जेव्हा कधी मंत्रिपदाची माळ पडेल, त्यावेळी पाहू," असे सूचक विधान त्यांनी केले.












Click it and Unblock the Notifications