'शाई सुकली की निघत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका'; निवडणूक आयुक्तांनी ठाकरेंचे आरोप फेटाळले
State Election Commission on voting ink controversy : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत बोटाला लावण्यात येणारी शाई नेलपॉलिश रिमूव्हरने निघत असल्याच्या तक्रारींवर आता राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले असून, "ही शाई पुसली जात असल्याचा दावा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी केला जात आहे," असे स्पष्ट केले आहे.

२०११ पासून मार्करचा वापर; शाईची विश्वासार्हता काय?
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोग २०११ पासून 'मार्कर पेन'चा वापर करत आहे. या शाईची वैशिष्ट्ये त्यांनी खालीलप्रमाणे मांडली. ही शाई बोटावर लावल्यानंतर तिला पूर्णपणे सुकण्यासाठी १० ते १२ सेकंद लागतात. मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडेपर्यंत हा वेळ पुरेसा असतो. एकदा का ही शाई वाळली की ती कोणत्याही रासायनिक द्राव्याने किंवा रिमूव्हरने काढता येत नाही.
भारतीय निवडणूक आयोग (ECI) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जी शाई वापरते, तीच शाई येथेही वापरण्यात आली आहे. "आयोगाच्या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे, कोणाचीही शाई पुसली गेलेली नाही," असे वाघमारे यांनी ठामपणे सांगितले.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाई पुसली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. यावर बोलताना आयुक्तांनी सांगितले की, अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वीही आल्या होत्या, मात्र त्यात तथ्य आढळले नाही. ही शाई 'कोरस' कंपनीची असून तिची गुणवत्ता तपासलेली आहे. केवळ निवडणुकीच्या वेळी संभ्रम पसरवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणूक आयोग पूर्णतः तटस्थ; 'फेक नरेटिव्ह'ला स्थान नाही
आयोगावर होत असलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपांना उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, आयोग कोणत्याही सत्ताधारी पक्षाला मदत करत नाही. आम्ही पूर्णपणे निष्पक्ष आहोत. आयोगाने ८५ टक्क्यांहून अधिक मतदारांना 'व्होटर स्लिप' पोहचवल्या आहेत. नाव शोधण्याची जबाबदारी मतदारांचीही आहे, त्यासाठी पोर्टल आणि अॅपची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी असतात, जे त्याच भागातील असतात. दुबार मतदाराची ओळख पटल्याशिवाय त्याला मतदान करू दिले जात नाही.
ईव्हीएम बिघाड आणि 'पाडू' यंत्राचा वापर
निवडणुकीत ईव्हीएममध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत वाघमारेंनी महत्त्वाची आकडेवारी सादर केली. मागील १० वर्षांत नवीन ईव्हीएम खरेदी केलेली नाही, जुन्याच मशिन वापरल्या जात असल्याने २ टक्के मशिन खराब होण्याचे प्रमाण आहे, जे तांत्रिकदृष्ट्या सामान्य आहे.
पाडू यंत्र
बोगस मतदारांना शोधण्यासाठी 'पाडू' (PADU) या यंत्राचा वापर २००४ पासून यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील सुधारणा
मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत 'इंटेल इंक' वापरण्याचा विचार आयोग करत आहे.












Click it and Unblock the Notifications