एकीकडे ठाकरे गट फुटत असताना, दुसरीकडे संजय राऊतांचं चॅलेंज... म्हणाले, मला फक्त 2 तास द्या
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची सर्वात जास्त चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वी मंबईत सुमारे ३५, संभाजीनगरमध्ये सुमारे २२ नगरसेवक व सहा महापौरही शिंदे गटात दाखल झाले. या सगळ्या गदारोळानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. ऑपरेशन टायगर त्यांनी सडकून टिका केलीय.

काय म्हणाले राऊत?
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हणाले की, शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर..? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल, तर यांचं अख्खं दुकान खाली होईल. मी मागेही म्हणालो होतो की, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या. अमित शाहही आमच्या पक्षात प्रवेश करतील. दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
सुडबुद्धीने सर्व सुरु
सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ऑपरेशन टायगरचं आम्हाला काय सांगता..? ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे. आम्हीही सत्तेत होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
संजय शिरसाटांचा पलटवार
एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मुंबईत जवळपास 35 नगरसेवक आले. संभाजीनगरमध्ये 20 ते 22 नगरसेवक आले, सहा महापौर आले. मला सांगा उद्धव ठाकरे गट राहिला तरी कुठे? आपला पक्ष कुठे चाललाय याकडे लक्ष द्या. पक्षाची वाताहात बडबड करून थांबत नसते. हे राऊतांना कधी कळेल देव जाणे," असं म्हणत संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.












Click it and Unblock the Notifications