सोलापुरात ऑपरेशन लोटस वेगात; फडणवीसांनी दिला ठाकरेंना धक्का, हा बडा नेता भाजपच्या गळाला!
solapur operation lotus News : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपचे कमळ जोरदार फुलताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांतील नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याच 'ऑपरेशन लोटस'चे सूत्रधार म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर
सोलापूर जिल्ह्यातील ४ माजी आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असलेले माजी आमदारांमध्ये राजन पाटील (राष्ट्रवादी, सोलापूर), बबन शिंदे (राष्ट्रवादी, माढा), यशवंत माने (राष्ट्रवादी, मोहोळ), दिलीप माने (काँग्रेस, सोलापूर दक्षिण), हा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.

ठाकरे गटाचे नेते दीपक साळुंखे भाजपच्या गळाला?
चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेनंतर आता सोलापूरच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय 'फटाका' फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे देखील भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा आहे. सांगोला येथे एका कार्यक्रमासाठी आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. साळुंखे यांच्या भेटीनंतर बोलताना जयकुमार गोरे यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यात दिवाळीचे अजून फटाके फुटतील." तसेच, 'सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने दिवाळीचे राजकीय फटाके सध्या फुटत आहेत, ते पुढेही असेच फुटत राहतील' असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
दीपक आबांचा राजकीय प्रवासाचा यू-टर्न
दीपक साळुंखे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) पक्षात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साळुंखे यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना ५० हजार मते मिळाली होती. आता साळुंखे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत असल्याने, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलेले 'ऑपरेशन लोटस' सोलापूर जिल्ह्यातील विरोधी पक्षांची अजून किती ताकद कमी करणार, हे दिवाळीनंतर स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications