Solapur News: दुसराही मुलगा गतिमंद? त्रस्त आईची 2 मुलासह विहिरीत आत्महत्या! सोलापूर जिल्ह्यातील घटना
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुसराही मुलगा गतिमंद असण्याची शक्यता डॉक्टरने वर्तवल्यानंतर निराश झालेल्या आईने दोन्ही मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक आणि तितकीच गंभीर घटना सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, चित्रा कविराज हाके (वय -28), पृथ्वीराज हाके ( वय- 7), स्वराज हाके (वय - 3)अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत.

मोठा मुलगा होता गतिमंद, त्यामुळे आधीच निराशा
या घटनेची सविस्तर हकिकत अशी की नान्नज येथील मूळ रहिवासी असलेले कविराज उर्फ दत्तात्रेय हाके हे आपली सासरवाडी असलेल्या वांगी या गावात राहत होते. त्यांचा मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतिमंद होता. त्याच्यानंतर जन्मलेला स्वराज हा ही गतिमंद असण्याची भीती दोन दिवसापूर्वी डॉक्टरांनी उपचारादरम्यान व्यक्त केली होती. यामुळे कविराज यांच्या पत्नी चित्रा या निराश झाल्या होत्या. या निराशेपोटीच त्यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत पृथ्वीराज व स्वराज या दोन्ही मुलासह विहिरीत उडी घेतली.
धाड्..काही तरी पडल्याचा आवाज अन् खळबळ
यावेळी हाके यांच्या शेजारी शेतात शेळी चालणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. यानंतर शेजाऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली मात्र विहिरीच्या कडेला असलेल्या दाट झाडीमुळे विहिरीपर्यंत पोहोचण्यास त्यांना वेळ लागला. यावेळी विहिरीत पाहिल्या असता तीन वर्षाचा स्वराज वर पाण्यावर तरंगत असल्याचा दिसून आला.
नागरिकांची धाव, शोधाशोध सुरु
यानंतर नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. यानंतर विहिरीत इतर दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. या घटनेची माहिती सोलापूर पोलीस स्थानकात कळविण्यात आली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांच्या शोधासाठी सोलापूर शहरातून अग्निशामक दलाचे एक पथक पाचारण करण्यात आले होते.
हेही वाचा : Pune Crime News : माझ्या बदनामीला जबाबदार कोण? स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा सवाल
आईचा टोकाचा निर्णय, तिघांचा जीव गेला
या पथकाच्या परिश्रमानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास चित्रा यांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले. मात्र पृथ्वीराज याचा मृतदेह उशीर पर्यंत सापडला नाही. आईने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे दोन मुलाला आपला जीव गमावा लागला या घटनेमुळे वांगी सह पंचक्रोशीत हळहळ पसरली होती.
हेही वाचा : Pune Crime News : पाणी आणायला गेला अन् अडकला! स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक












Click it and Unblock the Notifications