शोएब अख्तरचा घरचा आहेर! पाकिस्तानी संघाला सुनावलं; म्हणाला- टीम इंडियाला फक्त 2 संघ पराभूत करु शकतात
Shoaib Akhtar Slams Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना झाला, या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव केला. यामुळे रावळपिंडी एक्सप्रेस अर्थात शोएब अख्तरचा संयम सुटला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना अख्तरने पाकिस्तानी संघाच्या मानसिकतेवर आणि खेळाच्या दर्जावर सडकून टीका केली आहे. "पाकिस्तान सध्या 'बॅड क्रिकेट' खेळत असून भारत पुढील १०० वर्षांचा विचार करून मैदानात उतरत आहे," अशा शब्दांत त्याने भारतीय संघाचे कौतुक करत आपल्याच खेळाडूंना आरसा दाखवला आहे.

शाहीनकडून २३ धावा नको, विकेट हवी!
इशान किशनच्या खेळीचा संदर्भ देत अख्तर म्हणाला की, इशानची सेंच्युरी हुकली असली तरी तो ज्या पद्धतीने खेळला, ते कौतुकास्पद आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा हुकमी एक्का शाहीन शाह आफ्रिदीवर निशाणा साधताना तो म्हणाला, "आम्हाला शाहीनकडून फालतू २३ धावा नको आहेत, तर त्याच्याकडून विकेट्सची अपेक्षा आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळत आहे, ती मॉडर्न क्रिकेटची पद्धत नाही."
भारत ५०-१०० वर्ष पुढचं क्रिकेट खेळतोय
भारतीय संघाच्या प्रगतीवर भाष्य करताना शोएबने मान्य केले की, जागतिक क्रिकेटमध्ये भारताला रोखण्याची ताकद फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येच आहे. "भारत सध्या अशा फॉर्ममध्ये आहे की ते पुढील ५० ते १०० वर्षांचे क्रिकेट आज खेळत आहेत. टी-२० फॉरमॅटचा विचार केला तर पाकिस्तान खूप मागे पडला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे," असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.
'टॅलेंटच नाही'- अख्तर
यावेळी अख्तरने पाकिस्तानच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, "पूर्वी पाकिस्तानकडे उच्च दर्जाची गुणवत्ता असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. मोहम्मद कैफलाही ठाऊक आहे की पूर्वीचा पाकिस्तान संघ कसा होता. आता पाकिस्तान डब्यात खेळत आहे असे नाही, तर मुळात त्यांच्याकडे टॅलेंटच उरले नाहीये की काय, अशी भीती वाटते."
संघ निवडीवरही ओढले ताशेरे
पाकिस्तानी संघातील गोंधळावर भाष्य करताना तो म्हणाला की, आज आम्हाला आमचा सातवा खेळाडू कोण आहे हे सांगता येत नाही. एक काळ असा होता की, आमचा १५ वा खेळाडू संघात का नाही, म्हणून चाहत्यांकडून घोषणाबाजी व्हायची. मात्र आज निवडीसाठी पर्यायच उरलेले नाहीत.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध भारत का जिंकला? 'ही' आहेत विजयाची 5 कारणे; हे खेळाडू विजयाचे शिलेदार












Click it and Unblock the Notifications