उद्धव ठाकरेंना आज मोठा धक्का बसणार? शिंदे गटाचा दावा, अमरावतीच्या मेळाव्याकडे लक्ष
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आज अमरावतीमध्ये होत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) च्या विभागीय मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटातून शिंदे गटात होणारे हे पक्षांतर महत्त्वाचे मानले जात आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
अमरावतीमध्ये आज शिंदे गटाचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्री संजय राठोड यांच्यासह उदय सामंत उपस्थित होते. मात्र, आमदार संजय गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना सामंत यांनी एक मोठा खुलासा केला.
ते म्हणाले, "आज बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आमच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याच कार्यक्रमात संजय गायकवाड उपस्थित आहेत, त्यामुळे ते अमरावती मेळाव्यात येऊ शकले नाहीत." या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटासमोरील आव्हान
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे शिंदे गटाची ताकद वाढत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे पक्षांतर ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते. मुंबईसह अनेक प्रमुख महापालिकांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. त्यामुळे, पक्षाला होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले आहे. आजच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications