राजकारणात २३ तारखेला पुन्हा भुकंप? १० ते १५ आमदार फुटणार असल्याचा 'या' मोठ्या नेत्याचा दावा
शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतरही ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरुच राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत नाराज झालेले अनेक नेते व पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहे. नांदेडच्या लोहा-कंधार विधानसभेचे पराभूत उमेदवार एकनाथ पवार यांनीही ठाकरे गटाला आज सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्या एका विधानाने पु्न्हा खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले शेवाळे?
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून अनेक दावे केले आहेत. याच दाव्यांना उत्तर घेत आज शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २३ जानेवारीला महाराष्ट्रात पुन्हा भुकंप होणार आहे. काँग्रेस व ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. सुमारे १० ते १५ आमदार आमच्याकडे येतील, असे दिसतेय. शेवाळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.
राऊतांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी शिवसेना शिंदे गटात फुट पडल्याचा दावा, खा. संजय राऊत यांनी काल केला होता. मंत्री उदय सामंत हे २० आमदारांना घेऊन शिंदे गटापासून वेगळे होणार होते. शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने भाजपनेच हा प्लॅन केला होता, असा दावा संजय राऊतांनी केला होता. या दाव्यालाही शेवाळे यांनी खोडून काढले. आपले आमदार शिंदे गटात जाणार आहे, हे संजय राऊत व वडेट्टीवारांना समजलं आहे. त्यामुळेच ते असे दावे करत आहेत, असा टोलाही शेवाळे यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications