'लाडकी बहिण' बाबत सुनील केदारांचे खळबळजनक वक्तव्य! शितल म्हात्रे म्हणाल्या काँग्रेसचा चेहरा उघड झाला
Shital Mhatre called Sunil Kedar's sensational statement : महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे, लोकसभा निवडणूकीत चांगला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.अशातच आता काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी लाडकी बहिण योजनेबाबत एक खळबळजनक विधान करत काँग्रेसची अडचण केली आहे.
आमचे सरकार आले तर महालक्ष्मी योजना आणून महिलांना 3 हजार रुपये देणार असल्याचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी जाहीर केले आहे. यावर शिंदे गटाच्या आमदार शितल म्हात्रे यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शितल म्हात्रे म्हणाल्या की, यावरुन काॅंग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड झाला आहे.

शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने महिलांना आधार मिळाला आहे. परंतु काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला विरोधीआहे. केदार म्हणाले होते की त्यांचे सरकार आले तर ही योजना बंद करणार पण. यावरून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस नेहमीच महिला विरोधी
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात आरक्षण संपवणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे काँग्रेस नेहमीच महिला विरोधी आहे हे दिसून आले. आता सुनील केदार यांच्या रूपाने काँग्रेसचा महिला धोरण विरोधी खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका म्हात्रे यांनी केली.
बँक घोटाळ्यातील आरोपी काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू, असे तारे तोडले आहेत. एकूणच बहुजनांना आणि महिलांना लाभ मिळू नयेत हेच काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसच्या भुलथापांना भगिनींनी घाबरून जावू नये, असे आवाहनही म्हात्रे यांनी महिलांना केले आहे.
संजय निरुपम यांचीही टीका
शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनीही केदारांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री भेटी देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. काँग्रेसला आधीच अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस हादरली आहे, अशी टीकाही निरूपम यांनी केली.












Click it and Unblock the Notifications