'मविआ'च्या नेत्यांनी जाहीर केला 'गद्दारांचा पंचनामा'; म्हणाले- महायुतीने महाराष्ट्राशी गद्दारी केली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा निवडणूक आयोगाकडून होऊ शकते. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडीच्या वतीने एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत महायुती सरकारचा पंचनामा जाहीर केला. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधत शिंदे फडणवीस व अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला.
'गद्दारांचा पंचनामा' प्रसिद्ध करत भ्रष्टयुतीविरुध्द आरोपपत्र महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आज जारी करण्यात आले. महाविकास आघाडीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

महायुतीच्या लोकांकडून सत्ता काढून घ्यावी लागेल- शरद पवार
'महाराष्ट्र राज्य याचा एक वेगळा लौकिक होता प्रशासनाचा. देशामध्ये एक काळ असा होता उत्तम राज्य, उत्तम प्रशासन... आज ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि ते जे प्रशासकीय निर्णय घेतात, त्याची सामान्य लोकांची टिंगल व्हावी, अशी स्थिती निर्माण केली. गेल्या तीन महिन्यामध्ये मंत्रिमंडळानं किती निर्णय घेतले. त्या निर्णयासंबंधी अंमलबजावणी होण्याची शक्यता किती आहे, याचा आढावा घेतला. तर या राज्याच्या प्रशासनासंदर्भाचा लौकिक संपूर्ण देशामध्ये उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. शासकिय यंत्रणेशी सुसंवाद साधण्याची संधी मिळते. त्यावेळेला प्रशासन व्यवस्था कशी उध्वस्त झाली, याचे किस्से ऐकायला मिळतात. त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यावी लागेल.' असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झाली - उद्धव ठाकरे
'गद्दारांचा पंचनामा' गद्दारी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याशी केली नाही, तर ही गद्दारी महाराष्ट्राशी झालेली आहे. जणू काही महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झाली आहे. अशा पद्धतीनं हे सरकार चाललंय आणि चालवतंय. हे सरकार आता कुठेतरी घालवायला पाहिजे. येत्या महिना दिड महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत घालवायला पाहिजे. सर्व बाबतीत बोजवारा उडाला आहे. काल जी हत्या झाली, बाबा सिद्दिकी. आपल्या देशात कदाचित मुंबई एकमेव शहर असेल. ज्या मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहेत. आणखी पाच वाढवा, काही हरकत नाही. जे जे ज्यांचे ज्यांचे लाडके असतील ते ते सगळे त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय?महिला असुरक्षित आहे, राजकारणी असुरक्षित आहे, सत्ताधारी पक्षातले नेते असुरक्षित आहे,मग सामान्य जनतेचं काय? ' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
सरकारने सर्व उद्योग गुजरातला पळवले - नाना पटोले
'छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचं पाप केलं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप शिंदे फडणवीस सरकारनं केलं आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. महायुती सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. अतिवृष्टीनंतर केंद्राचं पथक आंध्र प्रदेशात गेले पण महाराष्ट्रात आले नाही. महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण या सरकारने सर्व उद्योग आणि रोजगार गुजरातला पळवले आहेत, आता हे सरकार घालवले पाहिजे.' असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.












Click it and Unblock the Notifications