विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार - उध्दव ठाकरे
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. राज्यातील ४८ पैकी तब्बल ३० जागा जिंकण्यात महाविकास आघाडीला यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते.

आज महाविकास आघाडीच्या वतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.विधानसभा निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत केला.
तिन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाली असून, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे, अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, खा. संजय राऊत, अदित्य ठाकरेसह महाविकास आघाडीतील नेत्यांची उपस्थिती होती.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा मिळवण्यात शिवसेना म्हणजेच तुम्हाला यश आलं. मात्र, निवडणूक निकालानंतर तुमच्या मित्र पक्षांचा परफॉर्मन्स चांगला राहिला, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, एक फार जुनं गाणं आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही, पण पवारसाहेब तुम्हाला नक्की माहिती असेल. माणिक वर्मा याचं ते गाणं आहे. ''पारिजात पडला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. तसेच, तरी देखील आम्ही पारिजाताला खतपाणी घालण्याचं सोडणार नाही, असही उद्धव ठाकरे म्हणाले.
जिथं प्रभू रामचंद्राच वास्तव्य तिथं भाजपने सपाटून मार खाल्ला - ठाकरे
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. नाशिकमधील काळाराम मंदिरात गेल्यानंतर आपण भाजपमुक्त भारत करायचं आहे, असं म्हटलं होतं. देशातील जनतेने आयोध्या आणि राज्यातील मतदारांनी भाजपविरोधात मतदान केलं. जिथं जिथं प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथं भाजपनं सपाटून मार खाल्ला असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लागवला.
विधानसभा निवडणूक ताकदीने लढवू, उद्धव ठाकरेंचा निर्धार
भाजप अजिंक्य आहे,त्यांना कोणी पराभूत करू शकत नाही. असं म्हटलं जात होतं. पण हा फोलपणा आहे. लोकसभा निवडणूक ही देश आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यानुसारच देशातील आणि राज्यातील जनतेने महाविकासआघाडी आणि 'इंडिया' आघाडीला कौल दिलाय. परंतु ही लढाई अजून संपलेली नाहीये, आता सुरू झाली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत ताकदीने लढू असं म्हटलंय.
केंद्रातील सरकार किती दिवस टिकेल याची खात्री नाही
देशात आता मोदी सरकार नाही तर एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकेल हे याची खात्री नाही, कारण ही युती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे, माहिती नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. इतकेच नाही तर विधानसभेसाठी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ जागांवर तयारी सुरू केल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं.यामुळे विधानसभेपूर्वीच महाविकास आघाडी बिघाडीत होणार असल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांवर आज पडदा पडला.












Click it and Unblock the Notifications